पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील ‘भारतीय जवान किसान पक्षा’चे उमेदवार नारायण अंकुशे यांच्यावर मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या प्रकरणी १३ मे या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बंदी असतांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा परिसरातील ‘सारथी प्रसारक मंडळ ज्ञानदीप इंग्लीश स्कूल’ येथील मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले. तसेच विनाअनुमती मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या प्रकरणी प्रकाश अंकुशे आणि त्यांच्यासह चित्रीकरण करणार्या ३ साथीदारांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिले. त्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरूरमध्ये मतदानापूर्वीच मतदानयंत्रे पडली बंद !
पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी झालेल्या मतदान यंत्र प्रात्यक्षिकामध्ये (मॉक पोल) ६० मतदान यंत्रे पालटण्यात आली. यामध्ये २४ बॅलेट युनिट, १० कंट्रोल युनिट आणि २६ व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीही विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदान यंत्रणा बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अर्धा घंटा, एक घंटा मतदारांना खोळंबून थांबावे लागले. (संबंधित दायित्वशून्य कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का ? – संपादक) त्यानंतर संबंधित सदोष मतदान यंत्रे पालटून नवीन यंत्रे बसवून मतदान प्रक्रिया पूर्ववत् करण्यात आली, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.