आंदोलक मुझफ्फराबादच्या विधानसभेला घेराव घालणार !
मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीच्या नेतृत्वात लाखो आंदोलकांनी राजधानी मुझफ्फराबादच्या दिशेने मोर्चा नेणे चालूच ठेवले आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मुझफ्फराबाद जिल्ह्यात प्रवेश केला. आंदोलक मुझफ्फराबाद शहरात विधानसभेला घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाक सैन्याला तैनात करण्यात आले आहे. यामुळे आंदोलक भडकले आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी सैनिकांना मारहाण करून पिटाळून लावले. संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट आणि भ्रमणभाष ५ दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, सरकारच्या भ्रष्ट प्रणालीमुळे आम्ही त्रस्त आहोत. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. आमचे आंदोलन शांततापूर्ण आहे, आम्हाला कुणाचीही हानी करायची नाही. एकही मागणी अपूर्ण राहिली, तरी आम्ही मागे हटणार नाही. सर्व मागण्या पूर्ण केल्यावरच मरण पत्करू.
या आंदोलनामुळे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरचे सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.