‘मला सेवा करतांना ‘मध्येच न सुचणे, ‘सेवा न करता शांत बसूया’, असे वाटणे, कंटाळा येणे किंवा उत्साह न जाणवणे, सेवेतील आनंद अनुभवता न येणे’, असे त्रास होत असत.
१. सेवा करतांना त्रास होत असल्यास भावजागृतीचे प्रयोग करणे
मला असे त्रास होत असतांना मी गुरुदेव वास्तव्य करत असलेल्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन भावजागृतीचे प्रयोग करू लागले. भावजागृतीचा प्रयोग करतांना ‘मी लहान मुलगी आहे आणि मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) खोलीत जाऊन तेथील चैतन्य ग्रहण करत आहे’, असे मला जाणवते.
२. गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन केलेले विविध भावजागृतीचे प्रयोग
अ. गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन आळवणे.
आ. गुरुदेवांच्या खोलीतील देवघरासमोर बसून नामजप करणे, स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे.
इ. गुरुदेव लिखाणाच्या सेवेला बसले असतांना त्यांच्या पाठमोर्या देहासमोर बसून नामजप करणे.
ई. गुरुदेव झोपायला जात असतील, तर त्यांचे पाय दाबून देणे.
उ. गुरुदेव झोपले असतील, तर त्यांच्या चरणांशी बसून नामजप करणे.
ऊ. गुरुदेवांसाठी कधी प्रसाद, तर कधी महाप्रसाद घेऊन त्यांच्या खोलीत जाणे
ए. गुरुदेवांची पाद्यपूजा करणे.
ऐ. गुरुदेवांसाठी फुलांची माळ बनवणे, ती माळ त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी स्टूल घेऊन त्यावर चढून ती त्यांच्या गळ्यात घालणे, तर कधी गुरुदेवांनीच मला त्यांच्या गळ्यात माळ घालण्यासाठी उचलून घेणे आणि मी त्यांच्या गळ्यात माळ घालणे.
ओ. कधी गुरुदेवांसमोर बसून त्यांची प्रीती अनुभवणे.
औ. गुरुदेवांच्या चरणांना रात्री तेल लावणे.
अं. गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करणे.
क. गुरुदेवांचे चरण घट्ट पकडून ठेवणे (प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजींनी जसे गुरुदेवांचे चरण पकडले होते तसे)
ख. मधे-मधे गुरुदेवांच्या खोलीत जाऊन गुरुदेवांना साधनेचा आढावा देणे.
ग. गुरुदेवांना प्रदक्षिणा घालणे.
घ. मी उंचीला लहान असल्याने गुरुदेवांच्या खोलीतील देवघरातील देवतांची पूजा स्टुलावर चढून करणे’
३. भावजागृतीचे प्रयोग केल्यामुळे झालेले लाभ
३ अ. ‘मी गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन आल्यावर माझा स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह चैतन्याने भारित होऊ लागला. मी सेवा करत असतांना मला आनंद मिळू लागला. त्यामुळे माझी सेवाही गतीने होऊ लागली’, असे मला अनुभवता येऊ लागले.
३ आ. ‘आवश्यकतेनुसार माझ्यावर सगुण-निर्गुण तत्त्वाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवू लागले.’
– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |