Purnima Nath : अमेरिकेतील हिंदूंची व्यथा मांडणार्‍या पूर्णिमा नाथ यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी !

विस्कॉनसिन राज्यातील मिलवॉकी येथून मिळाली उमेदवारी !

पूर्णिमा नाथ

मिलवॉकी (अमेरिका) – येथील भारतीय वंशाच्या पूर्णिमा नाथ या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार म्हणून अमेरिकेच्या संसदेच्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. येत्या ऑगस्टमध्ये अमेरिकेत ‘प्रायमरी’ (प्रथम टप्प्यातील पक्षांतर्गत निवडणूक) होत असून नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या मुख्य निवडणुका होत आहेत. यांतर्गत विस्कॉनसिन राज्याच्या चौथ्या मतदारसंघात म्हणजे मिलवॉकी शहरातून पूर्णिमा नाथ या खासदारकीसाठी उभ्या आहेत. त्या स्वत:ला ‘अनअपोलोजेटिक हिंदु’ (हिंदु म्हणण्यात कोणतीही लाज न बाळगणार्‍या) समजतात, असे त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी दूरभाषद्वारे बोलतांना सांगितले. अमेरिकेतील हिंदूंची व्यथा जगासमोर मांडण्यासाठी त्या लढा देत असल्याचे, तसेच येथील हिंदु समाजाच्या हितासाठी त्या कार्य करणार असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या.

नाथ यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे. त्यात म्हटले आहे की,

१. नाथ या राष्ट्रीय सुरक्षा, आतंकवादविरोध, सीमांचे रक्षण आदी सूत्रांच्या प्रखर समर्थक आहेत.

२. अधिकृत स्थलांतरित व्यक्ती असल्याने भूराजकीय विषयांची त्यांना सुस्पष्टता आहे. हे विषय स्थानिकांचे जीवन, शिक्षण आणि एकूण सौख्य यांसाठी आवश्यक कार्य बजावतात, असे त्या मानतात.

३. मूळ समस्यांकडे कानाडोळा करून राजकीयदृष्ट्या सोयीस्कर भूमिका मांडणे (‘पोलिटिकली करेक्ट’ रहाणे) हे समाजात रूढ झाले आहे. याचा समाजाला त्रास होत आहे. फूट पाडणारे राजकारण हे सामान्य नागरिक आणि समाज यांसाठी घातक सिद्ध होते. येथील हिंदु समाजाचा विकासासाठी त्या कटीबद्ध आहेत.

अमेरिकी राजकारणात हिंदूंविषयी कुणाला काही देणेघेणे नाही ! – पूर्णिमा नाथ

‘सनातन प्रभात’शी चर्चा करतांना नाथ म्हणाल्या की, मी प्रखर हिंदु म्हणूनच या निवडणुकीत उभी आहे. मला आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील हिंदूंच्या समस्या मांडायच्या आहेत. येथे केवळ गोरे आणि कृष्णवर्णीय यांच्याच अधिकारांविषयी बोलले जाते; परंतु ब्राऊन लोकांविषयी (हिंदूंविषयी) कुणाला काही देणेघेणे नाही. हिंदू येथे तुटपुंजे अल्पसंख्यांक म्हणून जीवन जगत आहेत.

पूर्णिमा नाथ यांच्याविषयी माहिती !

पूर्णिमा नाथ मूलत: अभियंता असून त्यांनी अमेरिकेत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या ‘नॉर्थवेस्टर्न विद्यापिठा’तील ‘केलॉग स्कूल ऑफ बिझनेस’मधून ‘एम्.बी.ए.’चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून कार्य केले आहे. सध्या त्या ‘स्पिंडल इंडिया’ नावाची अशासकीय संस्था चालवतात, तसेच ‘इंडिया फेस्ट विस्कॉन्सिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत. त्यांना विविध भारतीय वृत्तवाहिन्यांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ आणि ‘भूराजकारण’ यांच्या समीक्षक म्हणून आमंत्रित केले जाते. त्या बंगालचे विसाव्या शतकातील प्रसिद्ध संत ‘श्रीश्रीकैवल्या राम ठाकूर’ यांना गुरु मानतात.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या हितासाठी सातासमुद्रापलीकडे कार्य करणार्‍या पूर्णिमा नाथ यांचे अभिनंदन ! असे हिंदूच हिंदु धर्माची वास्तविक शक्ती होत !