धर्मप्रेमी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा भव्य सत्कार करणार ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद  

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे

छत्रपती संभाजीनगर – ‘अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची १० मे या दिवशी पुणे येथील न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर संत वृत्तीचे धर्मप्रेमी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे’, अशी माहिती येथील राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते तथा ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी ११ मे या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. तावडे यांच्यावर झालेला अन्याय चीड आणणारा !

ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे

या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. तावडे यांना गेल्या ८ वर्षांपासून विनाकारण कारागृहात रहावे लागले. एका उच्चशिक्षित व्यक्तीला कुठलेच पुरावे नसतांना अशा प्रकारे आयुष्यातील ८ वर्षे कारागृहात डांबून ठेवणे हा अन्याय निश्‍चितच चीड निर्माण करणारा आहे. वारकरी मंडळी, तसेच वैकुंठवासी पू. गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या प्रति नितांत आदर असणारे डॉ. तावडे सर्व वारकरी संस्था आणि मठाधिपती यांच्याशी परिचित आहेत. अत्यंत विनम्रता, तसेच देव, देश आणि धर्म यांसाठी समर्पणभाव (अहंकाराचा वारा न लगो राजसा माझिया विष्णुदासा भाविकांसी।) असाच त्यांचा स्वभाव आहे.