नवी देहली – भारताला चीनसमवेत प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवले जातील, अशी आशा आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य झाल्यावरच सीमेवर शांतता नांदू शकते, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका मुलाखतीत केले. ते म्हणाले की, उर्वरित प्रलंबित सूत्रांमध्ये प्रामुख्याने गस्त घालण्याचे अधिकार आणि गस्त घालण्याची क्षमता हे आहेत. आज चीनसमवेतचे आमचे संबंध सामान्य नाहीत; कारण सीमाभागातील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही.
जयशंकर म्हणाले की, मुत्सद्देगिरी हे संयमाचे काम आहे. मी म्हणीन की, जर संबंध सामान्य व्हायचे असतील, तर आपल्याला समस्या सोडवाव्या लागतील. मे २०२० पासून भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये संघर्ष चालू आहे. सीमावाद अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. जून २०२० मध्ये गलवान खोर्यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी संबंध सामान्य करणे आवश्यक असल्याचे भारताने सातत्याने सांगितले आहे.
‘भारत-पश्चिम आशिया-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या कार्यवाहीत होणारा विलंब ही निश्चितच चिंतेची गोष्ट !
जी-२० परिषदेत ठरलेल्या ‘भारत-पश्चिम आशिया-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’विषयीही या वेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारा विलंब हा पश्चिम आशियातील सद्य:स्थिती आणि या उपक्रमानंतर निर्माण झालेल्या अपेक्षा लक्षात घेता चिंतेचा विषय आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व भागधारक यासाठी कटीबद्ध आहेत; कारण ते याला एक चांगला उपक्रम मानतात. पश्चिम आशियातील सध्या चालू असलेल्या संकटामुळे प्रकल्पाला काही वर्षे विलंब होईल का, असे विचारले असता ते म्हणाले, ही आमच्यासाठी निश्चितच चिंतेची गोष्ट आहे आणि सप्टेंबर २०२३ मध्ये करारावर स्वाक्षरी करतांना आम्हाला अपेक्षा होत्या, त्यात आता काही फेरबदल करावे लागतील.