सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्ज्वल निकम : मुंबईचे कायदेशीर रखवालदार !

१. लोकसभेसाठी उत्तर-मध्य मुंबईतून सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी !

श्री. भाऊ तोरसेकर

‘उत्तर-मध्य मुंबई येथून प्रारंभी अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त निवडून येत होते. त्यानंतर तेथून त्यांची कन्या प्रिया दत्त याही निवडून आल्या आहेत. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचा पराभव होऊन भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा विजय झाला होता. वर्ष २०१४ मध्ये पूनम महाजन ही जागा लढवण्यासाठी इच्छुक नव्हत्या; पण प्रमोद महाजन यांच्या राज्यातील आणि बाहेरील अत्यंत निकटवर्तियांनी पूनम यांना निवडणूक लढण्यास राजी केले होते. त्यावर्षी पूनम महाजन एकूण मतदानाच्या ५६ टक्के मते घेऊन सहजपणे विजयी झाल्या होत्या. तसेच वर्ष २०१९ मध्येही त्यांनी ५४ टक्के मते घेऊन ही जागा राखली होती.

‘वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहमुत मिळवणार आहे’, असा त्यांना आत्मविश्वास आहे. ‘या निवडणुकीतही एकपक्षीय बहुमताला धोका नाही’, असे लक्षात आल्यानंतर भाजपने काही राजकीय प्रयोग केले. या अंतर्गत त्यांनी देशभरात काही उमेदवार पालटले, तर काही ठिकाणी नव्या पिढीचे आणि नव्या चेहर्‍याचे उमेदवार मैदानात आणले. मुंबईच्या बोरीवलीतही गोपाळ शेट्टी यांच्या ठिकाणी मंत्री पियुष गोयल यांना उतरवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्ष २०२४ मध्ये पूनम महाजन यांच्या जागी ख्यातनाम अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना आणले गेले आहे. निकम हे माझे मित्र असून मी त्यांना अनुमाने २० वर्षांपासून व्यक्तीगत ओळखतो. उत्तर-मध्य मुंबईत २० मे या दिवशी मतदान असून त्या ठिकाणी भाजपने उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार दिला आहे.

२. महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाच्या वेळी सर्व वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर मार्गदर्शन !

आजपर्यंत राजकारणात न पडता तटस्थ राहून वकिली करणारा हा मनुष्य माझ्या मते फार प्रामाणिक आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फाटाफूट झाली. त्यानंतर निवडणूक आयोग, सर्वाेच्च न्यायालयातील खटले किंवा विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीचा विषय असो, या सर्वांविषयी तटस्थपणे मत व्यक्त करणारा कायदेतज्ञ म्हणून अनेक मराठी वृत्तवाहिन्यांनी उज्ज्वल निकम यांना बोलावले होते. तेव्हा आपली राजकीय बाजू कुठल्या बाजूला झुकते हे कळू न देता, त्यांनी या सर्व विवादात कायद्याविषयी मतप्रदर्शन केले होते.

३. कायदेशीर बुद्धीमत्ता जनतेसाठी वाहिलेले अधिवक्ता उज्ज्वल निकम !

त्याही पलीकडे उज्ज्वल निकम यांची ओळख आपण लक्षात घेतली पाहिजे. हा मनुष्य भाजप किंवा कोणत्या पक्षात आहे, ही गोष्ट दुय्यम आहे, तो कायदाभिरू (कायदा मानणारा) माणूस आहे. भारतीय राज्यघटना आणि कायद्याची चौकट यांविषयी अगदी पावित्र्याने जगणारा अन् वागणारा म्हणूनच त्यांच्याकडे बघणे आवश्यक आहे. ते आता भाजपचे उमेदवार असतील; पण त्याहून हा माणूस कायदेमंडळात जाण्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्याचा विचार केला पाहिजे. तो विचार करतांना उज्ज्वल निकम यांनी न्यायालयीन क्षेत्रात जे कमावले आहे आणि जे खटले लढवून मिळवले आहे, त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. या माणसाला ज्या पद्धतीची बुद्धीमत्ता खटला लढवण्याच्या संदर्भात लाभलेली आहे, त्याचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते की, एवढ्या बुद्धीमत्तेच्या बळावर हा माणूस कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनुसिंघवी यांसारखे कोट्यवधी रुपयांचे शुल्क आकारून प्रचंड श्रीमंत होऊ शकला असता. असे असतांनाही सरकारी अधिवक्ता म्हणून विविध गुन्हेगारांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांनी सातत्याने खटले लढवले आहेत. जनहिताची चाड असलेला अधिवक्ता म्हणून अधिक आणि भाजपचा उमेदवार म्हणून अल्प पाहिले पाहिजे.

यापूर्वीही सरकारी खात्यात सरकारी अधिवक्ता म्हणून चांगले नाव किंवा अनुभव मिळवले की, त्यानंतर एकाहून एक कुख्यात गुन्हेगारांची वकिली करणारे शेकडो अधिवक्ते आपल्याला दाखवता येतील; परंतु उज्ज्वल निकम यांच्याकडे अपवाद म्हणून पहावे लागते. लहानसहान खटले नाही, तर मुंबईच्या वर्ष १९९२-९३ च्या दंगली आणि त्यानंतर झालेले बाँबस्फोट या प्रकरणांच्या प्रदीर्घ खटल्यात जनतेच्या वतीने सरकारी अधिवक्ते म्हणून त्यांनी दीर्घकालीन खटले लढवले आहेत, तसेच मुंबईवरील आक्रमणाचा कसाबविषयी खटला उज्ज्वल निकम यांनी लढवला होता. त्यासाठी त्यांना पाकिस्तानसह अन्य देशांतही जावे लागले होते. एवढे सगळे करून गाठीशी आले काय ? असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर नकारार्थी मिळेल. गुन्हा केलेल्या माणसाला त्याच्या गुन्ह्यातून सहज सोडवता येईल, एवढी त्यांची कायदेशीर बुद्धीमत्ता तल्लख आणि प्रखर आहे. असे असतांनाही आपली बुद्धी, कायदेशीर बुद्धीमत्ता आणि तर्कशास्त्र जनतेला समर्पित करणारा एक व्यावसायिक अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे बघितले पाहिजे. असा अधिवक्ता भाजपने मैदानात आणलेला आहे. तेव्हा त्यावर भाजपचा उमेदवार असा शिक्का मारणे माझ्या मते गैरलागू वाटते.

४. उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय निश्चित !

राजकारणात नव्याने प्रवेश करणारे उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास एक सांगता येईल की, भाजपनेही त्यांना एक उमेदवारी देण्यासाठी ही जागा दिलेली नाही. उत्तर-मध्य मुंबई ही भाजपसाठी अत्यंत सुरक्षित जागा समजता येते. माझ्या मते उज्ज्वल निकम यांचे नाव ठरण्यापूर्वीच तेथील भाजपचा विजय निश्चित झालेला होता. ज्या वेळी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपला विजयाची शाश्वती नव्हती, तेव्हा वर्ष २०१४ मध्ये कुठलाही फारसा वशिला नसतांना पूनम महाजन यांना ती जागा देण्यात आली होती. त्यांनी लागोपाठ दोनदा ती जागा जिंकून देतांना ५६ आणि ५४ टक्के मते मिळवली होती. त्यामुळे तेथे भाजपचे पारडे आधीच जड आहे. या मतदारसंघात ६ आमदार येतात. त्यातही भाजप किंवा महायुती याचे पारडे जड आहे. वांद्रे-पश्चिमचे भाजपचे आमदार आशिष शेलार आहेत. वांद्रे-पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे असले, तरी ते काँग्रेसपासून दुरावले आहेत. यासह कुर्ला आणि चांदिवली या दोन मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दिलीप लांडे हे आमदार आहेत.

वरील भाग बाजूला ठेवला, तरी या मतदारसंघात अनुमाने २८ टक्के मुसलमान मतदार आहेत. तेथून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी आशा लावून बसलेले आरिफ नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर ताशेरे झाडतांना ४८ पैकी एकही मुसलमान उमेदवार महाविकास आघाडीने दिला नाही; म्हणून अप्रसन्नता व्यक्त केली. दुसरीकडे अजित पवार यांच्या गोटात आलेले वांद्रे-पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे वांद्रे-पूर्वचे विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी हे पुत्र आहेत. हे दोघेही ज्या बाजूला आहेत, त्या बाजूची उमेदवारी उज्ज्वल निकम यांना मिळाली आहे.

५. मुंबईवरील आक्रमणकर्त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी अथक परिश्रमघेणारे अधिवक्ता उज्ज्वल निकम !

या सगळ्या राजकारणात उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी का दिली ? हे लक्षात घेतले पाहिजे. मुंबईवर जी काही आतंकवादी आक्रमणे झाली, मग ते दाऊदच्या मेमन टोळीने केलेले बाँबस्फोटाचे आक्रमण असो किंवा १० पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुंबईवर केलेले आक्रमण असो या खटल्यांतील ‘आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा आटापिटा करणारा आणि अथक कष्ट घेणारा अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे. ‘आम्ही मुंबई वाचवली’, असे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते राऊत सांगतात. तेव्हा त्या मुंबईला कायदेशीरपणे आतंकवादापासून वाचवणारे आणि गुन्हेगारांना शिक्षा देणारे अधिवक्ता उज्ज्वल निकम आहेत. त्यामुळे निकम यांच्यावर महाविकास आघाडीला टीका करणे अवघड जाणार आहे. त्या वेळी ‘मुंबईला आतंकवादापासून वाचवणारे अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची जी ओळख आहे, त्यातून महाविकास आघाडी ही आतंकवादाच्या प्रभावाखाली राजकारण करते, याकडेही भाजपने अंगुलीनिर्देश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे  मुंबईवरील दोन महाभयंकर अशा आतंकवादी आक्रमणांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे किंवा पीडित, तसेच घायाळ मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करणारे अधिवक्ता उज्ज्वल निकम यांचे या मुंबईनेच पांग फेडले पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

६. उज्ज्वल निकम यांना सर्वाधिक मतांनी निवडून देणे हे मुंबईकरांचे कर्तव्य !

एक मित्र म्हणून मी उज्ज्वल निकम यांचे समर्थन करणारच; पण त्याही पलीकडे हा केवळ भाऊ तोरसेकर यांचा मित्र नाही, तर हा मुंबईत शांतपणे आणि सुरक्षितपणे जगू इच्छिणार्‍या प्रत्येक मुंबईकराचा अतिशय जवळचा मित्र अन् रखवालदार म्हणून उज्ज्वल निकम यांचा विजय अपेक्षित आहे. नव्हे मी म्हणेन सर्वाधिक मतांनी उज्ज्वल निकम हे लोकसभेत निवडून गेले पाहिजे. हे प्रत्येक मुंबईकरांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडतांना त्यांच्यावर कुठला शिक्का बसला आहे आणि कुठल्या पक्षाच्या वतीने ते उभे आहे, ही गोष्ट अत्यंत दुय्यम आहे. त्याहून महत्त्वाचे, म्हणजे ते मुंबईकरांचे कायदेशीर रखवालदार आहेत. पोलीस किंवा गृहखाते यांनी कितीही परिश्रम घेतले, तरी ते परिश्रम आणि अन्वेषण यांचे सोने करणारे अधिवक्ते हा मुंबईचा सर्वांत आप्तस्वकीय असतो. एवढे भान प्रत्येक मुंबईकराने ठेवावे. मग तो उत्तर-मध्य मुंबईचा असो, दक्षिण-मध्य मुंबईचा असो, ईशान्य-पूर्व किंवा दक्षिण मुंबईतील असो, प्रत्येकासाठी उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय, ही अगत्याची आणि श्रद्धेची गोष्ट असली पाहिजे.’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक
(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)