Israel Hamas War : जर शस्त्रे संपली, तर आमच्या नखांद्वारे शत्रूला ठार मारू !

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे न पुरवण्याच्या चेतावणीला इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अवीव (इस्रायल) – ‘जर इस्रायलने गाझापट्टीतील राफाह शहरावर सैनिकी कारवाई चालू ठेवली, तर अमेरिका त्यांना बाँब आणि अन्य दारुगोळा देणे थांबवेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला दिली होती. यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, जर शस्त्रे संपली, तर इस्रायलचा प्रत्येक नागरिक शत्रूला स्वतःच्या नखांद्वारे ठार मारेल. इस्रायल पराभव पत्करणार नाही आणि एकटा उभा राहील.

नेतान्याहू पुढे म्हणाले की,

१. आमची खरी शक्ती ही एकतेमध्ये आहे. आम्ही देवाच्या साहाय्याने जिंकू.

२. इस्रायलच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी वर्ष १९४८ मध्ये आमच्याकडे शस्त्रे नव्हती. इस्रायलवर शस्त्रसंधीही होती; पण आत्मबळ, शौर्य आणि एकता यांच्या महान सामर्थ्याने आम्ही विजयी झालो.

३. आमच्यात आणि अमेरिकेत अनेकदा करार झाले होते; पण आमच्यात मतभेदही होते. मला आशा आहे की, आपण त्यांच्यावर मात करू शकू; परंतु आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला जे करायचे आहे, ते आम्ही करू. कोणताही दबाव आम्हाला इस्रायलचा बचाव करण्यापासून रोखू शकत नाही.

संपादकीय भूमिका

अशा विजिगीषू वृत्तीमुळेच छोटासा इस्रायल शेजारील इस्लामी देशांना भारी पडतो ! त्याचा आदर्श भारताने आणि प्रत्येक भारतियाने घेतला पाहिजे !