पात्र शिक्षकांना २० मेपर्यंत नियुक्ती न दिल्यास आंदोलन करण्याची प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची चेतावणी !
ओरोस : शिक्षक भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या शिक्षकांना २० मेपर्यंत नियुक्तीचे पत्र न दिल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत (अनिश्चित काळासाठी) धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने दिली आहे.
गेली अनेक वर्षे रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया चालू होऊन जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या ६०४ आणि उर्दू माध्यमाच्या ११ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे ५८६ आणि उर्दू माध्यमाचे ११ उमेदवार पात्र ठरले. सर्व पात्र उमेदवारांना ८ मार्च २०२४ या दिवशी नियुक्तीचे आदेशही देण्यात आले आणि त्यानंतर अचानक ही प्रक्रिया थांबवण्यात आली. ‘नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी पूर्वी कार्यरत असलेल्या ज्या शिक्षकांचे जिल्ह्यांतर्गत स्थानांतर होणे अपेक्षित आहे, त्या शिक्षकांच्या स्थानांतराची प्रक्रिया पूर्ण करा’, असा आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्यानंतर नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर निवडणुकाही घोषित झाल्या. यामुळे शिक्षकांविना विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी तर झालीच, तसेच ही प्रक्रिया लवकर चालू होणार कि नाही ? या विचाराने उमेदवारही त्रस्त झाले आहेत. आता निवडणुका झाल्या असून उमेदवारांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाप्रशासनाचा भोंगळ कारभार ! आगामी शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांविना मुलांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी प्रशासन तत्परतेने कृती करणार का ? |