Loksabha Elections 2024 : गोव्यात ७६.०६ टक्के विक्रमी मतदान ! – रमेश वर्मा, मुख्य निवडणूक अधिकारी

१७ कोटी ८२ लाख रुपये किमतीचा ऐवज कह्यात घेतला !

पणजी, ८ मे (वार्ता.) : गोव्यात ७ मे या दिवशी लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांसाठी एकूण ७६.०६ टक्के विक्रमी मतदान झाले. हा आकडा वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ७५ टक्के मतदान झाले होते. ७ मे या दिवशी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ७७.६९ टक्के, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ७४.४७ टक्के मतदान झाले. यामध्ये टपालाद्वारे केलेल्या (पोस्टल) मतदानाचा समावेश केलेला नाही.

राज्यातील ११ लाख ७९ सहस्र ३४४ मतदारांपैकी ८ लाख ९६ सहस्र ९५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २ लाख ८२ सहस्र ३८९ मतदारांनी मतदान केले नाही. यामध्ये टपालाद्वारे मतदान आणि घरी जाऊन केलेले मतदान (८५ वर्षांपवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात आली होती) यांची संख्या समाविष्ट केलेली नाही. मुख्य निवडणूक कार्यालयाकडे राज्यभरातून १९० तक्रारी आल्या आणि यामधील ३८ तक्रारी या आचारसंहिता भंग झाल्यासंबंधी आहेत. ७ मे या मतदानाच्या दिवशी १९ तक्रारी आल्या आहेत आणि या तक्रारींची शहानिशा चालू असून तक्रारीत तथ्य आढळल्यास योग्य कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले,

‘‘लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर १६ मार्चपासून राज्यात अवैध मद्य, रोख रक्कम, अमली पदार्थ, विविध प्रकारची आमिषे मिळून एकूण १७ कोटी ८२ लाख रुपये किमतीचा ऐवज कह्यात घेण्यात आला आहे. हा आकडा गोव्यात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हा आकडा वर्ष २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या ४० टक्के, तर वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५५ टक्के अधिक आहे.’’