‘२ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘रिॲलिटी शो’मध्ये पाहिलेल्या नृत्यप्रकारांविषयी पाहिले. आजच्या भागात ‘नृत्याचे आयोजक, स्पर्धक, परीक्षक आणि दर्शक यांच्याविषयी माझी (सौ. अनघा जोशी यांची) झालेली विचारप्रक्रिया’ येथे देत आहे.
(भाग २)
भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/789830.html
३. नैतिकता घालवून बसलेला समाज !
३ अ. कार्यक्रमातील एका प्रसंगातून कार्यक्रमाचे आयोजक, स्पर्धक आणि परीक्षक यांनी नैतिकतेला पार हद्दपार केल्याचे दिसणे : कार्यक्रमामध्येच एका परीक्षकाने प्रणयनृत्य करणार्या मुलीला ‘डेट’ (टीप) साठी विचारले. यातून ‘टी.आर्.पी.’(दूरचित्रवाणीवरील लोकप्रियता) वाढवण्यासाठी लोक किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात ?’, हे दिसले. त्यांच्यात ‘नैतिकता, शालीनता किंवा सभ्यता’, उरलेलीच नाही’, असे मला वाटले. अशा नृत्यप्रकारांना प्रोत्साहन दिल्याने स्पर्धकही अशाच प्रकारचे नृत्य करण्यात स्वारस्य दाखवतात. ‘अशा नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजक, स्पर्धक, त्यांना प्रोत्साहन देणारे परीक्षक आणि असे कार्यक्रम पहाणारे प्रेक्षक या सगळ्यांनीच नैतिकतेला पार हद्दपार केले आहे’, असे मला जाणवले.
(टीप – विशिष्ट दिवशी मुलगा-मुलगी एकमेकांना जेवायला बोलावून एकत्र रहाण्याच्या दृष्टीने एकमेकांशी चर्चा करतात.)
३ आ. नृत्याच्या कार्यक्रमाच्या परीक्षकांनी या नृत्यप्रकारांना प्रोत्साहन देणे : परीक्षक, स्पर्धक आणि प्रेक्षक सगळेच या नृत्यांचा आनंद घेत होते. परीक्षक हे नृत्यप्रकार आणि स्पर्धक यांना प्रोत्साहन देत होते. यावरून ‘कलेची स्थिती किती विदारक झाली आहे’, याची मला कल्पना आली. अशा कार्यक्रमांद्वारे अनैतिकतेला प्रोत्साहन मिळत असून त्यातून ‘अनैतिक वागणे योग्य आहे’, असा संदेश समाजात जात आहे. ‘टी.आर्.पी.’(दूरचित्रवाणीवरील लोकप्रियता) साठी पाश्चात्त्यांचे असे अंधानुकरण करणे अतिशय अनुचित आहे. समाजातील नैतिकता पार रसातळाला गेल्याचा तो परिणाम आहे.
३ इ. सवंग प्रसिद्धीसाठी लाज गुंडाळून ठेवलेली दृश्ये रंगमंचावर दाखवून रंगमंच आणि कला यांचा अपमान करणारे आयोजक, स्पर्धक अन् परीक्षक ! : दृश्य माध्यमांमुळे त्यावर प्रक्षेपित होणार्या कार्यक्रमांचे समाजमनावर त्वरित संस्कार होतात. त्या माध्यमांवर असे अनैतिक कार्यक्रम दाखवून आयोजक, स्पर्धक आणि परीक्षक समाजाला अधोगतीला नेत आहेत. ते कलेच्या नावाखाली बीभत्स दृश्ये दाखवून रंगमंच आणि कला यांचा अपमान करत आहेत. स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक आणि परीक्षक यांच्यावर प्रसिद्धीचा घट्ट पगडा असल्यामुळे ‘आपण काय प्रस्तुत करत आहोत ?’, याचे त्यांना भानच राहिलेले नाही. अशा प्रकारे नृत्य प्रस्तुत करून हे लोक भारतीय शास्त्रीय नृत्याचा अपमान करत आहेत. असल्या कलेच्या प्रस्तुतीकरणाने लाजेने मान खाली जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजक, स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षकही समाजाच्या नैतिक अधोगतीला उत्तरदायी आहेत.
४. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकाने ‘स्वनियंत्रण’ नसणे
काही लोक याला ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चे गोंडस नाव देतील; परंतु ‘या व्यक्तीस्वातंत्र्याचे परिणाम किती भयानक होत आहेत ?’, हे समाजात घडणार्या घटनांवरून दिसते. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली माणूस इतका स्वतंत्र आणि बंधनरहीत झाला आहे की, त्याला ‘स्वनियंत्रण’ करणे कठीण झाले आहे.
५. प्रेक्षकांचे अभिप्राय
या कार्यक्रमावर लोकांनी दिलेल्या टिपण्या वाचल्या. केवळ ४ – ५ जणांनीच अशा कार्यक्रमांवर बंदी घालायची मागणी केलेली दिसली. काहींनी ‘हा कलेचा अपमान आहे’, असेही त्यांच्या अभिप्रायामध्ये लिहिले, तर काहींनी ‘हा कार्यक्रम घरातील सगळ्यांनी पहाण्यासारखा नाही’, असे लिहिले आहे. ‘ज्यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात टिपण्या दिल्या, त्यांचे अभिनंदन करावे’, असे मला वाटले. यातून ‘काही अंशी तरी सात्त्विक लोक अजून समाजात आहेत’, हे दिसले; परंतु ‘८० टक्के जणांनी सादरीकरण चांगले केले’, असे लिहिले आहे.
५ अ. प्रेक्षकांच्या बोथट झालेल्या संवेदना ! : यावरून ‘प्रेक्षकांच्या संवेदना बोथट झाल्या कि काय ?’, असा विचार माझ्या मनात आला. हा कार्यक्रम पाहून ‘घरातील लहान मुलांवर काय परिणाम होईल ?’, याचा जराही विचार झालेला दिसत नाही. या कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन सकारात्मक प्रतिसाद देणारे ‘स्वतःच्या पाल्यांवरही तेच संस्कार करत आहेत’, हे त्यांच्या लक्षात येत नाही का ? पुढे त्या मुलांकडून वाईट कृती झाल्यास त्याला त्या मुलांचे पालकच उत्तरदायी असतील.
६. नैतिकता हा समाधानी आणि आनंदी समाजाचा पाया असणे
नैतिकता हा समाधानी आणि आनंदी समाजाचा पाया आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे हे पापच आहे. अशा नृत्यप्रदर्शनांना आळा न घातल्यास मनुष्याची वेगाने नैतिक अधोगती होईल; म्हणून अशा कार्यक्रमांना विरोध करणे, हे कलाकर आणि समाज दोघांचेही तेवढेच नैतिक कर्तव्य आहे.
७. ‘कलेचा अपमान करणार्यांना विरोध करणे’, हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य असणे
कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती लवकर साध्य होऊ शकते. ‘कलेची मनोभावे आराधना करणार्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद मिळतील’, यात तिळमात्र शंका नाही; परंतु अशा कार्यक्रमांचे आयोजन करून कलेचा अपमान करणार्यांना देव क्षमा करणार नाही. कलेची जपणूक करण्याच्या समवेतच ‘कलेचा कुणी अपमान करत असेल, तर त्यात वाहवत न जाता त्याला विरोध करणे’, हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे.
कलाकारांनो, कलेची शास्त्रशुद्ध, सात्त्विक जोपासना करून, त्याला साधनेची जोड देऊया. कला ईश्वरचरणी अर्पित करून देवाचे आशीर्वाद मिळवूया !
(समाप्त)
– सौ. अनघा शशांक जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए.(संगीत)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२२.४.२०२४)