रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुगुणा गुज्जेटी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण रूप अनुभवतांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०१९ पासून मला स्वप्नात कधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते, तर कधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होते. वर्ष २०२१ मध्ये मला हे अधिक प्रमाणात अनुभवायला आले. मला ‘अशी स्वप्ने पडण्याचे कारण काय आहे ?’, याविषयी मी चिंतन केले असता माझ्या अंतरात्म्याने दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या साधनेचे दायित्व श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना देणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

परात्पर गुरु डॉ. आठवले मला सांगत आहेत, ‘पुढे माझ्या ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ असतील. मी ज्याप्रमाणे तुम्हाला समजून घेतो, त्याप्रमाणेच त्या तुम्हाला समजून घेतील. मी तुम्हाला त्यांच्याकडे सोपवत आहे. तुम्ही माझ्यात अडकू नका, नाहीतर मी स्थूलदेहाचा त्याग केल्यानंतर तुम्हाला दुःख होईल.’

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेचा ‘ॐ नमो नारायणा ।’ असा नामजप चालू होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले नराचे नारायण झाले असल्याने ‘ॐ नमो नारायणा ।’ असा नामजप चालू झाला’, असे साधिकेला वाटणे

कु. सुगुणा गुज्जेटी

एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. माझ्या अंतर्मनातून ‘ॐ नमो नारायणा ।’ असा नामजप चालू झाला. तेव्हा मला वाटले, ‘माझा हा नामजप आपोआप का चालू झाला ?’ तेव्हा माझ्या अंतर्मनातून उत्तर आले, ‘परात्पर गुरुदेव आता नराचे नारायण झाले आहेत. आता परात्पर गुरुदेव माझे परम पूज्य राहिले नाहीत. आता ते भगवान बनले आहेत. ते नारायण झाले आहेत.’ या सत्संगात मला त्यांच्यातील निर्गुण तत्त्व अनुभवायला येत होते. तेव्हा मला वाटले, ‘ते कधीही त्यांची इच्छा होईल, तेव्हा देहत्याग करू शकतात; मात्र ते भक्तवत्सल असल्यामुळे आम्हा सर्व साधकांसाठी थांबले आहेत.’

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. पंडित केशव गिंडे महाराज यांची भेट, म्हणजे आत्मा अन् परमात्मा यांचे मीलन होत आहे’, असे जाणवणे

एकदा पू. पंडित केशव गिंडे महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा त्यांच्या चेहर्‍याकडे पहाताच मला जांभया येऊ लागल्या. मी त्यांना पाहिल्यावर मला ते प्रीतीस्वरूप वाटले. मला त्यांचा चेहरा गुलाबी दिसला. पू. गिंडे महाराज परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागत होऊन नमस्कार करत होते. तेव्हा परात्पर गुरुदेव सावकाश आसंदीतून उठून उभे राहिले. माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरुदेव, या प्रसंगातून आपण मला काय शिकवणार आहात ?’ माझ्या मनात अशा प्रश्नांची शृंखला चालू झाली. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव हे परमात्मा आहेत आणि पू. गिंडे महाराज आत्मा आहेत अन् आत्मा आणि परमात्मा यांचे मीलन होत आहे’, असे माझ्या आतून उत्तर आले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सगुणापेक्षा निर्गुण रूप अधिक अनुभवायला येणे

परात्पर गुरुदेवांचे जेव्हा मला दर्शन होते, तेव्हा त्यांच्या स्थूलदेहाचे सगुण रूप अत्यल्प आणि निर्गुण रूप मला अधिक प्रमाणात अनुभवायला येते. त्यांचे दर्शन झाल्यावर माझे मन स्थिर आणि शांत होते. परात्पर गुरुदेवांचा दिव्य अनमोल सत्संग मिळाल्यापासून ‘मी कोणत्या तरी वेगळ्या लोकात आहे’, असे मला अनुभवायला येत आहे.’

– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक