पणजी, ६ मे (वार्ता.)- भाजपने मन्युष्यबळ आणि साधनसुविधा यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच भाजपने अनुसूचित जमातीलाही योग्य न्याय दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी गोव्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे. लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने भाजप जिंकणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५ मे या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वीरियातो फर्नांडिस यांनी कोणतेही कारण नसतांना संविधानाचे सूत्र प्रचाराच्या वेळी उपस्थित केले. केंद्रात संयुक्त पुरागामी आघाडी सरकार सत्तेवर असतांना गोव्यातही काँग्रेसचे सरकार होते; मात्र त्या काळात काँग्रेस गोव्याचा विकास करू शकली नाही. मला कोणत्याही भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. गोमंतकीय नागरिक हेच माझे भविष्यवेत्ते आहेत. गोमंतकीय नागरिक भाजपसमवेत आहेत.’’ याप्रसंगी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘भाजपने इतर मागासवर्गीयांसाठी कोणतेच काम केलेले नसल्याचा प्रचार खोटा आहे. वास्तविक भाजपने इतर मागासवर्गीयांसाठी घटनात्मक अधिकार मिळवून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर मागासवर्गीयांसाठी सर्व सुविधा पुरवल्या आहेत. काँग्रेसने आता ‘अन्याय यात्रा’ काढण्याची वेळ आली आहे.’’