धुळे येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन अवैध !

धुळे – येथे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे, तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त आय.पी.एस्. अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन छाननीअंती अवैध ठरवले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मुसलमान मतदार आहेत. या मतदारांचा लाभ उचलण्यासाठी ‘एम्.आय.एम्.’कडून धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आला होता.  ‘निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे’, अशी माहिती अब्दुल रहमान यांनी दिली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आवेदन भरण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस होता.