नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के; २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – शहरात ३ मे या दिवशी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात येथे बसलेला हा सलग दुसरा भूकंपाचा धक्का आहे. नागपूर परिसरात २.५ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे; मात्र भूकंपाची २.५ रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नाही, असे सांगण्यात आले. नागपूर शेजारच्या काही भागासह मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगाणा यांचा काही भाग हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून मोडतो. उत्तर नागपूर येथील सिललेवाडा हे या भूकंपाचे केंद्र असून भूमीच्या ५ कि.मी. आत याचे केंद्र आहे. ही घटना धोकादायक नसून अशा प्रकारचे भूकंप होत आहेत, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी २७ मार्च या दिवशी देहली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नागपूर जिल्ह्यात ३ लहान भूकंपाची नोंद केली होती. त्या वेळी हिंगणा येथील झिलपी तलावाजवळ दुपारी २.५३ वाजता २.८ तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कांद्रीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्याची नोंद झाली होती.