केसाने गळा कापणार्यांपासून नेहमी सावध रहावे, ही शिकवण जशी आपल्याला दैनंदिन आचरणात आणणे लाभदायी असते, तशीच ती राष्ट्राच्याही संदर्भात अंगीकारणे सर्वथः हिताचे असते. भारतविरोधी किंवा हिंदुविरोधी ‘टूलकिट’ किती भयानक असते ?, हे आपण देहलीतील शेतकरी आंदोलन आणि नूपुर शर्मा, या प्रकरणांत पाहिले. एखाद्या प्रकरणात मोठ्या स्वरूपाची आंदोलने करतांना त्याचा एक कृती कार्यक्रम सिद्ध केला जातो. त्याला ‘टूलकिट’ असे म्हणतात. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्या विविध घडामोडी पहाता याच टूलकिटने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येते. देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे चालू आहे. अशात गेल्या ८-१० दिवसांत विदेशातून विशेषतः अमेरिकेकडून अचानक भारतावर जोरदार टीका केली जात असून जणू ‘भारत हा जगातील नरक आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आरंभ झाला तो विदेशातील एका वर्तमानपत्राने भारतातील निवडणुकीविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखाद्वारे. या लेखात ‘भारतात सध्या एवढी उष्णता असतांना तो निवडणुका का घेत आहे ?’, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वास्तविक विदेशी प्रसारमाध्यमांना भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसण्याचा काय अधिकार ?
आतापर्यंत भारतातील बहुतांश निवडणुका उन्हाळ्यातच झालेल्या आहेत. तेव्हा हा प्रश्नच हास्यास्पद आहे. भर उन्हात मतदान करण्याचे जे कर्म भारतियांना राष्ट्रीय कर्तव्य वाटते, त्याचे विदेशींना एवढे ‘चटके’ बसणे अनाकलनीय आहे. अर्थात् भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ‘पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे भारतीय निवडणुकीत स्वत:ला राजकीय खेळाडू मानत आहेत. त्यांच्या टीकेचा भारताच्या निवडणुकीवर परिणाम होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे’, अशा शब्दांत या लेखाचा समाचार घेतला. त्यापाठोपाठ ‘भारताच्या कोरोनाविरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो’, अशी आवई नुकतीच उठवण्यात आली. भारतात ‘ॲस्ट्राझेनेका- ऑक्सफोर्ड विद्यापीठ’ (ब्रिटन) आणि ‘सिरम इन्स्टिट्यूट’ (पुणे) यांनी मिळून ‘कोव्हिशिल्ड’ ही लस बनवली होती. ही लस भारतासह जगभरातील नागरिकांना देण्यात आली होती. ही घटना २ वर्षांपूर्वीची किंवा त्याही अगोदरची आहे. ‘ही लस घेतली आणि व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला किंवा ती गेली’, असे अजून कुठेही सिद्ध झालेले नाही. तरीही हे सूत्र रेटण्यात आले आणि भारताची अपकीर्ती करण्यात आली. त्यामुळे हे जुने सूत्र आता निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढणे, हेसुद्धा अनाकलनीयच. यावर ‘या लसीमुळे असा कुठलाही धोका नाही’, असे अनेकांनी छातीठोकपणे सांगितले. तथापि काँग्रेसने याचेही भांडवल केले आणि हे निवडणुकीत प्रचाराचे सूत्र बनवले ! या घटनेनंतर अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने ‘भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचला होता’, असा गंभीर आरोप केला. कुठलाही पुरावा न देता बिनदिक्तपणे इतका गंभीर आरोप केवळ द्वेषातून केला जाऊ शकतो. हाही आरोप भारताने फेटाळून लावला. असाच आरोप ऑस्ट्रेलियातील ‘एबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीनेही केला. तिने वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने २ भारतीय हेरांना देशाबाहेर काढल्याचा दावा केला. यापूर्वी कॅनडाने खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. एवढ्यावरच ही ‘टूलकिट टोळी’ थांबली नाही. अमेरिकेच्या ‘यूएस् स्टेट डिपार्टमेंट’ने भारतातील सध्याचा निवडणुकीचा ‘मुहूर्त’ साधून एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात मणीपूर दंगलीचा संदर्भ देत ‘भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे’, असा आरोप करण्यात आला. हे उल्लंघन कसे होत आहे ?, हे सांगण्याची तसदीसुद्धा या लेखात घेतलेली दिसत नाही.
याउलट याच अमेरिकेत १८ एप्रिलला ओहायो राज्यात पोलिसांनी फ्रँक टायसन नावाच्या ५३ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्तीची भररस्त्यात गळा दाबून हत्या केली. वर्ष २०२० मध्येही अमेरिकेच्या पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीची अशाच प्रकारे हत्या केली होती. तेव्हा अमेरिकेला मानवाधिकार आठवले नाही का ? ‘आपला तो बाब्या अन् इतरांचं ते कारटं’, अशी अमेरिकेची मनोवृत्ती आहे. अर्थात् भारताने अमेरिकेचा मानवाधिकाराच्या संदर्भातलाही आरोप फेटाळला. यानंतर पुन्हा अमेरिकेतील ‘सी.एन्.एन्.’ या वृत्तवाहिनीने ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला हिंदु राष्ट्रात परावर्तित केले’, असा धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा लेख लिहिला आणि तो जगभरातील प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवला.
समान सूर !
वरील सर्व आरोप किंवा दावे जुने तर आहेतच; पण त्यांत जराही तथ्य नाही. मग प्रश्न असा पडतो की, हे सर्व आताच का उकरून काढण्यात आले ? याचे उत्तर एकच, ते म्हणजे भारताची करता येईल तितकी अपकीर्ती करून भारताच्या कथित दुःस्थितीस सत्ताधारी भाजप कसा उत्तरदायी आहे ?, हे सांगणे. दुर्दैव म्हणजे भारतातील काही लोकही या टूलकिटचा जणू अविभाज्य घटक बनल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी २२ एप्रिलला एका प्रचारसभेत बोलतांना ‘भारताने गोमंतकियांवर राज्यघटना बलपूर्वक लादली. याविषयीचे निवेदन मी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर केले होते’, असे राष्ट्रघातकी विधान केले. विशेष म्हणजे गोमंतकीय जनतेसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी राहुल गांधी यांच्याकडे केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ‘काँग्रेस ‘भारत जोडा’यला नाही, तर तोडायला निघाली आहे’, हे सिद्ध करण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा दुसरा कुठला हवा ? या विधानावरून विरियातो यांच्यावर देशभरातून प्रचंड टीका झाली; परंतु राहुल गांधी यांनी ना फर्नांडिस यांचे विधान खोटे असल्याचे म्हटले, ना अयोग्य असल्याचे म्हटले. यावरून या सर्वांना राहुल गांधी यांचाच पाठिंबा असल्याचे दिसून येते.
वर उल्लेखलेल्या टूलकिटवाल्यांनाही भारत दुभंगलेलाच हवा आहे. भारतात त्यांना राष्ट्रहितैषी विचारसरणी असलेल्यांची राजवट नको आहे. थोडक्यात काय, तर जे या भारतद्वेषी टूलकिटवाल्यांना हवे आहे, तेच काँग्रेसला हवे आहे आणि त्यासाठी टूलकिटवाल्यांचीच भाषा काँग्रेस वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. एकूणच या टूलकिटवाल्यांना प्रभावी उत्तर देण्याची हीच वेळ आणि संधी आहे. भारत अमेरिकेला मित्र समजतो; परंतु भारताने आता तरी हा अपसमज दूर करावा. पाकिस्तान आपला उघड शत्रू, तर अमेरिका छुपा शत्रू, म्हणजेच केसाने गळा कापणारा आहे, हे जाणावे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अखंड सावध रहाणे, हाच यावर प्रभावी उपाय आहे !
पाकिस्तान आपला उघड शत्रू, तर अमेरिका छुपा शत्रू आहे, हे भारताने जाणावे ! |