‘महादेव बेटिंग ॲप’चा प्रचार केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक !

मुंबई –  विविध खेळांवर सट्टा लावून त्यातून अब्जावधीचा व्यवहार अवैधपणे करणार्‍या ‘महादेव बेटिंग ॲप’मध्ये भागीदार असल्याप्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगड येथून अटक केली आहे. पोलिसांनी साहिल खान याला पसार घोषित केले होते.

महादेव बेटिंगच्या ‘द लायन बुक ॲप’मध्ये साहिल खान सहभागी असल्याप्रकरणी यापूर्वी साहिल खान याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्याची चौकशी करण्यात आली होती; मात्र त्यानंतर वारंवार समन्स पाठवूनही साहिल खान चौकशीसाठी आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला पसार घोषित केले होते. अटकेच्या शक्यतेने साहिल खान याने मुंबई उच्च न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी साहिल खान याच्यासह अन्य २१ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा !

‘महादेव बेटिंग ॲप’शी संबंधित ६७ बेटिंग संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात आहेत. भारतामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे अधिकोषात १ सहस्र ७०० हून अधिक खाती उघडून याचा पैसा गोळा करण्यात आला. हा पैसा हवाला आणि कूटचलन यांद्वारे परदेशात पाठवण्यात आला. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी या गुन्हाचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाकडूनच साहिल खान यांची चौकशी चालू होती. हा घोटाळा १५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रकमेचा असून या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडूनही चौकशी चालू आहे.