मुख्यमंत्री केजरीवाल यांना केवळ सत्तेची भूक ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – मद्य धोरण प्रकरणात अटक होऊनही त्यागपत्र न देता अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय हितापेक्षा व्यक्तीगत हितालाच प्राधान्य दिले आहे, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना फटकारले. मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंह अरोरा यांच्या खंडपिठाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी वरील भाष्य केले.

न्यायालयाने म्हटले की, केजरीवाल यांना केवळ सत्तेची भूक आहे. समस्या ही आहे की, तुम्ही सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहात. यामुळे तुम्हाला सत्ता मिळत नाही. एका समाजसेवी संस्थेने न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी चालू असतांना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

सौजन्य IndiaTV 

देहली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसून त्यासंदर्भात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी न्यायालयात सांगितले की, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची कोणतीही स्थायी समिती नसल्याने यासंदर्भात कोणताही निर्णय घेता येत नाही. दुसरीकडे सरकारी अधिवक्त्याकडून सांगण्यात आले की, देहली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांच्याकडून समजले की, स्थायी समितीच्या अनुपस्थितीत योग्य प्राधिकरणाकडे अधिकार सोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची संमती आवश्यक आहे. तेव्हा न्यायालयाने वरील टिप्पणी केली.