न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याची स्वाभिमानी संघटनेची चेतावणी !
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणार्या तलावांवर नव्यानेच नियुक्त केलेले सुरक्षारक्षक ५ मास वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास सर्व सुरक्षारक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या सिंधुदुर्गनगरी येथील तलावात बसून उपोषण करू, अशी चेतावणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २३ प्रकल्पांसाठी २७ सुरक्षारक्षकांची नोव्हेंबर २०२३ मध्ये रत्नागिरी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाद्वारे नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या करतांना जिल्ह्यातील काही दलालांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. सुरक्षारक्षक मंडळ आणि दलाल यांनी मिळून घाईने नियुक्त्या दिल्या; मात्र या सुरक्षारक्षकांना वेतन देण्यात आलेले नाही, असा आरोप करत गावडे यांनी या प्रश्नी कामगार न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.