Hezbollah Attack Israel : हिजबुल्लाने इस्रायलवर डागले ३५ रॉकेट

सैन्याच्या मुख्यालयाला केले लक्ष्य!

तेल अवीव (इस्रायल) – इराणचे समर्थन असलेल्या लेबनॉनमधील जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाने २२ एप्रिलच्या रात्री इस्रायलवर ३५ रॉकेटद्वारे आक्रमण केले. याद्वारे इस्रायल सैन्याच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. याविषयी इस्रायलच्या संरक्षणदलाने सांगितले की, लेबनॉनमधून आलेले रॉकेट इस्रायलच्या साफेद शहरात पडले; मात्र यात कोणतीही हानी झाली नाही. यानंतर आम्ही याला प्रत्युत्तर दिले.

हमासविरुद्ध युद्ध चालू झाल्यानंतर हिजबुल्ला सतत इस्रायलवर आक्रमणे करत आहे. या काळात इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत आतापर्यंत हिजबुल्लाच्या ३७६  आतंकवाद्यांचा मृत्यू झाला आहे. या काळात इस्रायलमध्ये १० सैनिक आणि ८ नागरिक यांचाही मृत्यू झाला आहे.

हिजबुल्ला संघटनेची माहिती

‘हिज्बुल्ला’ या शब्दाचा अर्थ ‘देवाचा पक्ष’ असा होतो. ही संघटना शिया इस्लामी, राजकीय, सैनिक आणि सामाजिक संघटना म्हणून स्वतःचे वर्णन करते. ही संघटना म्हणजे लेबनॉनमधील एक शक्तीशाली गट आहे. अमेरिका आणि अनेक देश यांनी तिला आतंकवादी संघटना घोषित केले आहे. इराणकडून तिला साहाय्य मिळते.