BrahMos Missile : भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवला !

नवी देहली – भारताने फिलिपिन्सला ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रां’चा पुरवठा चालू केला आहे. वर्ष २०२२ मध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ३ सहस्र १३२ कोटी रुपयांचा करार झाला होता.या कराराच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे. ही क्षेपणास्त्रे फिलिपिन्स ‘मरीन कॉर्प्स’कडे सुपुर्द केली जाणार आहेत.

दक्षिण चीन समुद्रात सतत होणार्‍या चकमकींमुळे चीनसमवेतचा तणाव वाढत असतांना फिलिपिन्सला ही क्षेपणास्त्र प्रणाली मिळाली आहे. फिलिपिन्स त्याच्या किनारी भागात ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीच्या ३ बॅटर्‍या तैनात करेल आणि या प्रदेशातील कोणत्याही धोक्यापासून स्वतःचे रक्षण करेल.

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर्.डी.ओ.) आणि रशियाच्या ‘एन्.पी.ओ. माशिनोस्ट्रोयेनिया’ यांच्यातील संयुक्त उपक्रम असून तो जगातील सर्वांत यशस्वी क्षेपणास्त्र कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यात ब्रह्मोसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.