Kanker Naxal Encounter : (म्हणे) ‘भाजपच्या राज्यात अनेक बनावट चकमकी घडल्या आहेत !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

नक्षलवाद्यांच्या विरोधातील चकमक खोटी ठरवण्याचा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न

मुख्यमंत्री विष्णुदेव साय व माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

कवर्धा (छत्तीसगड) – देशात अनेक बनावट चकमकी घडल्या आहेत, ज्या आमच्या राजवटीत घडल्या नाहीत. त्यांच्या (भाजपच्या) राजवटीत अनेकांना खोट्या प्रकरणांत अटकही करण्यात आली आहे. त्यांनी (भाजपच्या राज्य सरकारने) आदिवासींना धमकावले आणि त्यांना अटकही केली. गेल्या ४ महिन्यांपासून ते हे काम करत आहेत. कवर्धा जिल्ह्यातही लोकांना धमक्या देण्याचे प्रकार चालूच आहेत, असा अश्‍लाघ्य आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. १७ एप्रिल या दिवशी २९ नक्षलवाद्यांना कांकेर येथील चकमकीत ठार केल्याच्या घटनेवरून त्यांनी हा आरोप केला. बघेल यांनी या चकमकीला खोटे ठरवण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे.

चकमक बनावट असल्याचे काँग्रेसने सिद्ध करावे ! – मुख्यमंत्री विष्णुदेव साय

मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी काँग्रेसच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी साय म्हणाले की, प्रत्येक सूत्राचे राजकारण करू नये. या चकमकीला बनावट म्हणणे हा सुरक्षादलांचा अपमान आहे.

उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, तुम्हाला चकमक बनावट असल्याचे सिद्ध करावे लागेल किंवा तुम्हाला सुरक्षादलांची क्षमा मागावी लागेल.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस सत्तेत असतांनाच नक्षलवाद उदयास आला आणि तो फोफावला, हे सत्य काँग्रेस मान्य करील का ? असे होऊ देणार्‍या काँग्रेसवाल्यांनी प्रथम कठोर प्रायश्‍चित्त घ्यावे !
  • देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात झालेली चकमकही काँग्रेसने बनावट ठरवण्याचा प्रयत्न केला होता. या आक्रमणात एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार हुतात्मा होऊनही काँग्रेसने आतंकवाद्यांची तळी उचलली होती. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?