महाराष्ट्रात मतांसाठी पैसे, मद्य, अमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात वापर !

मुंबई – निवडणुकीच्या काळात घातलेल्या धाडींमध्ये नियमित सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच घोषित केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पैसे, मद्य, अमली पदार्थ यांचा वापर करण्यात आल्याचे स्वत: निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीमधून उघड झाले आहे.

महाराष्ट्रात १ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत केंद्र आणि राज्य शासन यांच्या विविध यंत्रणांनी टाकलेल्या धाडींमध्ये ३९ कोटी १० लाख रुपये जप्त करण्यात आले. २७ कोटी १८ लाख रुपयांचे मद्य पकडण्यात आले. ६३ कोटी ८२ लाख रुपयांचे सोने, चांदी आदी मौल्यवान दागिने, तर तब्बल २१२ कोटी ८२ रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले आहे. यांसह अन्य ७८ कोटींहून अधिक मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे. या एकूण कारवाईत ४२१ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ७० सहस्र ९६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

१ मार्च ते ११ एप्रिल या कालावधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातून ४३ सहस्र ८९३ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत, तर ७२३ शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ७० सहस्र ९६७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.