वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

मागील भागात ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आता त्या पुढील भाग येथे दिला आहे.

(भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784838.html

श्री. लखन जाधवगुरुजींचे मर्दानी खेळांतील प्राविण्य !

ढाल-तलवारीचे प्रात्यक्षिक दाखवतांना श्री. लखन जाधवगुरुजी

‘वर्ष २००८ मध्ये गुरुजींनी एक विश्वविक्रम केला होता. दांडपट्ट्याने लिंबे कापण्याची स्पर्धा प्रचलित आहे. या स्पर्धेला शस्त्रकलेत ‘पट्टकाप’ म्हणतात. एका घंट्यात ३ सहस्र ३०० लिंबे दांडपट्ट्याने कापण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी त्याचे आयोजन केले. त्यांची पहिल्या १५ मिनिटांतच २ सहस्र ५०० लिंबे कापून झाली आणि पट्टा तुटला. त्यामुळे अधिकार्‍यांनी लगेच दुसर्‍या पट्ट्याची व्यवस्था करून पुन्हा पहिल्यापासून चालू करायला सांगितले. त्यानुसार दुसर्‍या वेळी त्यांनी ४६ मिनिटांमध्ये ३ सहस्र ८०२ लिंबे कापली आणि पुन्हा पट्टा तुटल्याने तेथेच थांबावे लागले. याची विश्वविक्रम म्हणून नोंद झाली.’

– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे

१. कर्तेपणा नसणे

‘व्यायाम आणि शस्त्रविद्येत गुरुजींनी विशेष प्रावीण्य मिळवले असूनही त्यांचे बोलणे आणि कृती यांत कर्तेपणा जाणवत नाही. ‘ते सतत शिकण्याच्या स्थितीत आहेत’, असे जाणवते.

२. इतरांना घडवणे

गुरुकुलाच्या स्थापनेपूर्वीच गुरुजींनी स्वतःच्या समवेत असलेल्या सहकार्‍यांना घडवले.

३. इतरांचा विचार करणे

‘आम्हाला पुष्कळ तीव्रतेच्या व्यायामाची सवय नाही’, हे लक्षात घेऊन गुरुजींनी आमची पुष्कळ काळजी घेतली. ‘ते गुरुकुलात आम्हाला निवासासाठी स्वतंत्र खोली देऊ शकले नाहीत. त्यांना आमचे गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांसह रहायचे नियोजन करावे लागले’, याची त्यांना खंत वाटली. त्यासाठी त्यांनी आमची क्षमा मागितली. या प्रसंगातून त्यांचा सनातन आश्रम आणि गुरुदेव यांच्याप्रती असलेला भाव जाणवला अन् ‘त्यांच्यात अहं अल्प आहे’, हेही लक्षात आले.

गुरुकुलात शिकवणार्‍या आचार्यांविषयी जाणवलेली सूत्रे

१. स्वतः अभ्यासक्रम शिकून नंतर नवीन विद्यार्थ्यांना शिकवणे : ‘विद्यार्थी गुरुकुलात दीर्घ काळ राहून एका टप्प्यापर्यंत युद्धकला आणि व्यावहारिक शिक्षण घेतात. त्यांना ‘आचार्य’ म्हणून संबोधले जाते. हे आचार्य नवीन विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आणि युद्धकला शिकवतात. त्याच वेळी हे आचार्य स्वतःही युद्धकलेतील पुढचे प्रकार शिकत असतात. सर्वच आचार्यांचे रहाणीमान अत्यंत साधे आणि सात्त्विक आहे. त्यांचा दिनक्रम विद्यार्थ्यांप्रमाणेच पहाटे ४ वाजता चालू होतो. ‘‘भूमिती, गणित, विज्ञान’, या शाळेत शिकवत असलेल्या विषयाचा प्रतिदिनच्या व्यवहारात कसा उपयोग करायचा ?’, हे गुरुकुलातील दैनंदिन सेवा करतांना आचार्य मुलांना शिकवतात. प्रत्येकाला त्याच्या आकलन क्षमतेनुसार शिकवले जाते.

२. सरावातील चुका आणि बारकावे नम्रतेने सांगणे : आचार्यांचे शिकवणे सोप्या भाषेत असायचे. आम्हाला काही समजले नाही, तर ते आमच्या स्थितीला येऊन आम्हाला समजावून सांगायचे. ते आम्हाला आमच्या सरावातील चुका आणि बारकावे वेळोवेळी नम्रतेने समजावून सांगायचे.’

– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे

४. सनातन संस्थेवरील विश्वास !

४ अ. पुष्कळ दुर्मिळ आणि जुने ग्रंथ वाचण्याची अन् त्यातील आवश्यक सूत्रांची छायाचित्रे काढण्याची सहजतेने अनुमती देणे : ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांच्या नाजूक स्थितीमुळे ते वाचण्याची किंवा हाताळण्याची गुरुकुलातील आचार्य सोडून कुणालाच अनुमती नाही. सनातन संस्थेचे कार्य गुरुजींना चांगले ठाऊक असल्यामुळे गुरुजींना साधकांविषयी विश्वास वाटतो; म्हणून त्यांनी आम्हाला कुठलीही अडचण न सांगता ग्रंथ वाचण्याची किंवा त्यातील आवश्यक लिखाणांचे छायाचित्र काढण्याचीही अनुमती दिली.

सध्या समाजामध्ये ‘स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांपासून लपवणे, ते न सांगणे, पैसे घेऊन ज्ञान देणे’, असे प्रकार बघायला मिळतात; याउलट गुरुजींच्या या कृतीमुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

४ आ. शिबिरातील अभ्याक्रमाव्यतिरिक्त व्यायाम शिकवणे : त्यांचा ८ दिवसांच्या शिबिराचा अभ्यासक्रम ठरलेला आहे; पण आम्हाला त्याखेरीज इतर काही व्यायाम प्रकार शिकायची इच्छा होती. त्यांनी तेही आम्हाला शिकवण्याचे नियोजन केले.

‍‍५. विद्यार्थ्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन करणे

पूर्वी गुरुकुल पद्धतीत कुठलाही ठराविक अभ्यासक्रम नसायचा. शिष्याची कुवत आणि गुण यांनुसार वेळोवेळी गुरु त्याला ज्ञान देत असत. प्रश्नोत्तरातूनच गुरुकुलातील अधिकांश शिक्षण होत असे. गुरुजी आम्हाला म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे त्या त्या वेळी निरसन होणे आवश्यक असते.’’ कुणाला काही प्रश्न पडल्यास किंवा कुणाला काही बोलायचे असल्यास गुरुजी त्यांना नेहमी वेळ देतात. ‘कुणाला रात्री उशिरा अगदी मध्यरात्रीही काही विचारायचे झाले, तर त्यासाठी गुरुजी उपलब्ध व्हावेत’, यासाठी ते रात्री खोलीत न झोपता पडवीमध्ये कापडी तंबू ला‍वून झोपतात. यातून ‘त्यांचा समर्पण भाव, त्याग आणि इतरांचा विचार’, हे गुण शिकता आले. आम्ही त्यांच्याकडे व्यायामाविषयीच्या शंका विचारायला गेल्यावरही ते आमच्या प्रत्येक प्रश्नाचे नेमकेपणाने आणि शास्त्राला धरून समर्पक उत्तर देत असत. कधी एखाद्या विषयाचे उत्तर त्यांना ठाऊक नसल्यास ते तसे प्रांजळपणे सांगत असत.

६. काही सेवांसाठी गुरुजी बाहेर गेल्यावर आम्हाला ते नसल्याची उणीव भासत होती.

७. गुरुजींचा मुलगा पार्थ (वय २ वर्षे) याची जाणवलेली वैशिष्ट्ये

गुरुजींचा मुलगा पार्थ २ वर्षांचा आहे. आम्हाला त्याच्यातही वैशिष्ट्यपूर्ण गुण जाणवले. आम्ही त्याला ‘सूर्यनमस्कार घालून दाखव’, असे म्हटल्यावर त्याने त्यातील काही भाग करून दाखवला. तो पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील चित्रे पाहून ‘जिजामाता’, ‘शहाजी महाराज’, ‘शिवाजी महाराज’, ‘मा‍वळे’ असे ओळखतो. गुरुकुलात शिकवण्यात येणारे काही श्लोकही त्याला पाठ झाले आहेत. आतापासूनच त्याला व्यायाम आणि क्षात्रधर्म यांचे बाळकडू मिळत आहे. आम्ही गुरुजींना भेट म्हणून सनातन-निर्मित ‘भगवान श्रीकृष्णाचे चित्र’ आणि ‘पंचांग’ दिले. त्याकडे पहातांना पार्थला पुष्कळ आनंद झाला.’

(क्रमशः)

– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785507.html