वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’मध्ये भारतीय व्यायामपद्धत आणि आचार यांचे जाणवलेले वेगळेपण !

मागील भागात आपण ‘श्री. लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग ५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785170.html

गुरुकुलातील विद्यार्थांशी चर्चा करताना १ श्री. लखन जाधवगुरुजी

भारतीय व्यायाम केल्यावर झालेला चांगला परिणाम !

१. व्यायामाने होणारी गुडघेदुखी पूर्ण थांबणे

‘मी गुरुकुलात जाण्यापूर्वी वैयक्तिक स्तरावर काही व्यायाम करत होते. धावण्याचा व्यायाम केल्यानंतर मला गुडघेदुखी होऊ लागली होती. ‘याचे कारण काय असेल ?’, हे शोधण्यासाठी ‘फिजिओथेरपी’च्या (भौतिकोपचार) दृष्टीने कुठले स्नायू अशक्त असतील ?’, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना काढून त्यानुसार व्यायामही चालू केले होते; परंतु मला फारसा पालट जाणवत नव्हता. ‘फिजिओथेरपी’च्या शास्त्रानुसार बैठक (स्क्वॅट) घालण्याची पद्धत निराळी आहे. ‘बैठक घालतांना गुडघे अंगठ्याच्या पुढे जायला नको; कारण त्याने गुडघ्यावर ताण येऊन त्रास होऊ शकतो’, असे शिकवले जाते. त्यामुळे आतापर्यंत मी याच तत्त्वाला धरून बैठक घालत होते; परंतु गुरुकुलात गेल्यावर भारतीय व्यायाम प्रकार शिकत असतांना बैठका घालण्याच्या पद्धतीत गुडघे अंगठ्याच्या पुढे जातात. येथे आल्यावर व्यायाम करतांना आरंभी माझी गुडघेदुखी वाढली होती; परंतु २ – ३ दिवसानंतर ती पूर्णपणे थांबली. हा अनुभव मला प्रत्यक्ष घेता आला. यावरून ‘भारतीय व्यायाम हे किती परिपूर्ण आहेत ?’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले.’ – भौतिकोपचारतज्ञ  सौ. अक्षता रेडकर

२. भारतीय व्यायामामुळे स्नायू बळकट होऊन सांध्यांना आधार मिळणे

‘गेल्या काही मासांत व्यायाम करतांना माझ्या पाठ आणि खांदा येथून आवाज येऊ लागले होते. नियमित व्यायाम चालू असूनही ते आवाज न्यून न होता वाढतच होते. भारतीय पद्धतीचे व्यायाम चालू केल्यावर ३ – ४ दिवसांतच आवाज येणे न्यून झाले. याविषयी गुरुजींनी सांगितले, ‘‘स्नायू बळकट होऊ लागल्यामुळे सांध्यांना आधार मिळू लागला आहे; म्हणून आवाज येणे न्यून झाले आहे.’’- भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे

३. पूर्वी अधिक व्यायाम केला नसूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे गुरुकुलात प्रतिदिन ५ – ६ घंटे व्यायाम करता येणे

‘यापूर्वी मी कधीच ४५ मिनिटांहून अधिक कालावधीसाठी व्यायाम केला नव्हता. गुरुकुलात जाण्यापूर्वी ‘मला हे जमेल का ?’, अशी मनामध्ये धाकधूक होती; पण गुरुदेवांचा संकल्प कार्यरत होता. त्यामुळे दिवसातून ५ – ६ घंटे व्यायाम करायला जमले. ‘मला जमले’, असे म्हणण्यापेक्षा देवानेच मला बळ दिले. त्यामुळे मी सर्व व्यायाम शिकू आणि करू शकले. ही अनुभूती आम्ही तिघांनीही अनुभवली.’ – भौतिकोपचारतज्ञ कु. वैदेही शिंदे

१. भारतीय पद्धतीच्या व्यायाम प्रकाराची जाणवलेली वैशिष्ट्ये !

श्री. लखन जाधव (गुरुजी)

१ अ. भारतीय व्यायाम करतांना देवतांचीही उपासना होऊन त्यांचे चैतन्य आणि आशीर्वाद लाभणे : ‘गुरुकुलात प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार शिकवले जातात. सूर्यनमस्कार, भूमीनमस्कार इत्यादी भारतीय व्यायाम प्रकार केल्याने एक प्रकारे देवतांची उपासनाही होते. हे व्यायाम करतांना भारतीय वाद्यांचा वापर केलेले शास्त्रीय संगीत लावतात. काही व्यायाम प्रकार करतांना मारुतीची विविध नावे घेतात किंवा त्याचा जयघोष केला जातो. यांमुळे व्यायाम करतांना शरिरावर ताण येत असला, तरी उत्साह वाढतो. व्यायामाचे चित्रीकरण असल्यास मुली नऊवारी साडी आणि मुले धोतर असे सात्त्विक कपडे परिधान करतात. व्यायाम करतांना ते संख्यात्मक मोजण्यापेक्षा मंत्र म्हणत केल्याने भारतीय व्यायामाचा शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो. मंत्र म्हटल्यामुळे उत्साहही वाढतो आणि आपण नकळत अधिक प्रमाणात व्यायाम करतो.

१ आ. शरीरयष्टी सडपातळ असूनही उत्तम प्रकारची शारीरिक क्षमता निर्माण होणे : येथील विद्यार्थ्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून ‘त्यांच्यात किती उत्तम प्रकारची शारीरिक क्षमता आहे ?’, हे कळणारही नाही. ‘काही जणांमधे ५०० सूर्यनमस्कार, २०० हून अधिक दंड-बैठका काढण्याची क्षमता होती’, याचे आम्हाला कौतुक वाटले. ही मुले दिसायला सडपातळ दिसतात; पण त्यांची कमालीची शारीरिक क्षमता पाहून भारतीय व्यायामाचे हे  आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात आले. आधुनिक व्यायामशाळेत स्नायूंचा आकार वाढण्याकडे अधिक कल असल्याचे लक्षात येते; याउलट ‘भारतीय व्यायाम केल्यावर स्नायूंचा आकारमान वाढत नसला, तरी त्यांचे बळ पुष्कळ वाढून उत्तम शारीरिक क्षमता निर्माण होते’, असे आम्हाला जाणवले.

२. भारतीय आचारांचा होणारा लाभ !

२ अ. लाल मातीत व्यायाम करतांना कुठलाही शारीरिक त्रास न होता आल्हाददायक वाटणे : आम्ही प्रथमच तेथील लाल मातीत व्यायाम केला. यापूर्वी आम्हाला लादीवर व्यायाम करायची सवय होती. आम्हाला मातीचा स्पर्शच मऊ आणि आल्हाददायक वाटत होता. ‘त्यातून आमच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे आम्हाला जाणवले. लादीवर व्यायाम करतांना गुडघे आणि घोटे यांना त्रास होतो; याउलट मातीमध्ये व्यायाम करतांना असा कुठलाही त्रास न जाणवता आणखी व्यायाम करावासा वाटतो.

२ आ. शेणाने सारवलेल्या भिंती आणि भूमी यांमुळे खोलीतील वातावरण उबदार रहाणे : खोल्यांमधील भूमी आणि भिंती शेणाने सारवलेल्या होत्या. गोव्याच्या तुलनेत येथे अधिक थंडी असूनही खोलीत उबदार वाटायचे. थंडी असूनही थंड पाण्यात हात-पाय धुतांना त्रास झाला नाही. पाण्यातील शीतलता अनुभवता आली.

२ इ. निसर्गरम्य ठिकाण, शुद्ध आणि स्वच्छ हवा, चुलीवरचे जेवण इत्यादींमुळे प्रदूषणमुक्त सात्त्विक वातावणाचा आनंद मिळणे : गुरुकुल गावाबाहेर असल्याने आमच्या भ्रमणभाषला नेटवर्क अत्यल्प असायचे. येथील शुद्ध आणि प्रदूषणमुक्त हवा,  निसर्गरम्य ठिकाण, चुलीवरचे जेवण, भांडी घासण्यासाठी बंबात निर्माण झालेल्या राखेचा वापर इत्यादींमुळे काही काळ आम्ही सर्व प्रकारच्या ‘रेडिएशन’ (पेशींना हानी पोचवणार्‍या लहरी) आणि रसायने यांपासून दूर होतो. त्यामुळे आम्हाला तेथील सात्त्विक वातावरणाचा आनंद घेता आला.

ऋषिमुनींनी ध्यानातून ‘वनस्पतीच्या कुठल्या भागाचा कशासाठी उपयोग करता येतो’, ते जाणून घेणे

एकदा वाचन करतांना श्री. लखन जाधवगुरुजींनी सांगितले, ‘आयुर्वेदाचा अभ्यास करतांना आपल्या ॠषिमुनींनी वनस्पतींचा औषधी उपयोग करून घेण्यासाठी वनस्पतींना इजा न होऊ देता ध्यान लावून त्या वनस्पतींशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रत्येक भागाचे, म्हणजे पान, फूल, फळ, साल, खोड, मूळ इत्यादींचे उपयोग जाणून घेतले. अलीकडच्या विज्ञानाला ते शक्य नाही, संशोधन करण्यासाठी त्यांना प्राण्यांचा जीव घ्यावा लागतो किंवा मृतदेहांवर संशोधन करावे लागते.’

– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे

३. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारा भारतीय समाज !

आजकाल समाजामध्ये भरपूर पैसे घेऊन व्यायाम आणि योगासने यांचे वर्ग घेतले जातात. व्यायाम करतांना आधुनिक पद्धतीनुसार कपडे परिधान करून पाश्चात्त्य संगीत लावून पाश्चात्त्य विकृतीप्रमाणे अंगविक्षेप करून व्यायामांचे प्रकार घेतले जातात. आजकाल ‘या सर्वांतून शारीरिक सौंदर्य वाढवणे’, हे ध्येय ठेवले जाते. त्यामुळे ‘व्यायाम शिकवणे’, हे पैसा मिळवण्याचे मोठे माध्यम झाले आहे. ‘आजची पिढी पाश्चात्त्य विकृतीचे अनुकरण करत असल्याने भारतीय व्यायामाच्या होणार्‍या अलभ्य लाभापासून वंचित रहात आहे’, असे आमच्या लक्षात आले.’

४. कृतज्ञता

आम्ही ‘सव्यसाचि’ गुरुकुलात भारतीय व्यायाम प्रकार शिकण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ‘आमचा दिवस कसा संपायचा ?’, हे आमच्या लक्षातही यायचे नाही. आमचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकानंतर एक नियोजन असायचे. त्यामुळे आम्हाला आनंद मिळायचा. गुरुकुलात आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याविषयी गुरुकृपेने सर्व लिखाण करता आले. आम्हाला शिकण्याची संधी दिल्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः नमन !’

(समाप्त)

– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)