दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. सदाशिव सीताराम घाग

१. श्री. सदाशिव सीताराम घाग, कुडाळ  

‘गेले वर्षभर मी प्रत्येक आठवड्यातून एकदा, कधी २ वेळा रात्रीच्या वेळी म्हापसा येथील छापखान्यातून दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणण्याची सेवा करत आहे. ती सेवा करतांना ‘मी काहीच करत नसून देवच सर्व करून घेत आहे. आपण एक पाऊल पुढे टाकल्यावर देव १० पावले जवळ येतो’, हे मला अनुभवता येत आहे.

१ अ. काम करून पुष्कळ थकलेला असतांनाच गठ्ठे आणण्याची सेवा मिळणे, तरी ती सेवा झाल्यावर पुष्कळ आनंद मिळणे : मी ज्या दिवशी पूर्ण दिवसभर झालेल्या कामामुळे थकलेला असतो, त्याच दिवशी नेमका उत्तरदायी साधकाचा मला ‘आज गठ्ठे आणण्याच्या सेवेला जायचे आहे’, असा निरोप येतो. तेव्हा माझी भावजागृती होते. ‘देवाने मला सेवेची संधी दिली आहे’, या विचाराने मला कृतज्ञता वाटते. रात्री १ ते दीड वाजेपर्यंत गठ्ठे आणण्याची सेवा करूनही दुसर्‍या दिवशी मनाला वेगळाच आनंद जाणवतो.

१ इ. झालेले लाभ !

१. मी स्वखर्चाने गठ्ठे आणण्याच्या सेवेसाठी जातो. ही सेवा करायला लागल्यापासून मला व्यवसायात पुरेशी कामे मिळू लागली आहेत. त्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी आपोआप सुटत आहेत.

२. ‘कामात येणारे सर्व अडथळे दूर होऊन प्रत्येक अडचणीत देवच साहाय्य करतो’, हे मला अनुभवता आले.

१ ई. जाणवलेला पालट ! 

१. या सेवेतून माझी प्रसंग स्वीकारण्याची वृत्ती वाढून मनोलय होत आहे. माझे मन स्थिर झाले आहे.

१ उ. अनुभूती

१ उ १. ‘श्री देव रामेश्वर’च्या रथोत्सवाच्या दिवशी गठ्ठे आणण्याची सेवा मिळावी’, असे वाटणे आणि गुरुकृपेने ती सेवा मिळणे : १०.३.२०२४ या दिवशी ‘आकेरी’ गावामध्ये ‘श्री देव रामेश्वर’चा रथोत्सव होता. त्या दिवशी सकाळपासून मला वाटत होते, ‘आज मला गठ्ठे आणण्याची सेवा मिळायला हवी’; परंतु २ – ३ दिवसांपूर्वीच मी ती सेवा केली होती आणि ती सेवा आठवड्यातून दुसर्‍यांदा क्वचितच मिळते. मी कामावरून घरी आल्यावर मनातील सेवेची ओढ वाढली होती. रात्री ८.३० वाजता उत्तरदायी साधकाने मला गठ्ठे आणण्याची सेवा करायला सांगितली, तेव्हा माझी भावजागृती झाली. देव मला सेवेची संधी देतो आणि करूनही घेतो’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ उ २. गठ्ठे आणण्याची सेवा करून रथोत्सवाला गेल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ ओढत आहे’, असे जाणवून पुष्कळ भावजागृती होणे : त्या रात्री गठ्ठे घेऊन साधारण २ वाजता मी रामेश्वर मंदिरात आलो. देवाचे मनोभावे दर्शन घेऊन रथाच्या ठिकाणी गेल्यावर मला प.पू. गुरुदेवांच्या रथोत्सवाची आठवण झाली. ‘मी साक्षात् गुरुदेवांचा रथ ओढत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ‘सर्व काही देवच करून घेतो’, याची अनुभूती देऊन देवाने मला पुष्कळ आनंद दिला.

१ उ ३. कृतज्ञता : सर्व ईश्वरेच्छेने केल्यावर देव भरभरून देतो. ‘आपले काही नाही, सर्व देवाचेच आहे’, याची जाणीव क्षणोक्षणी होते. ‘गुरुदेवांनी मला सेवेची संधी देऊन अनुभूती दिली’, यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ही शब्दसुमने गुरुचरणी अर्पण !’

कु. पूजा धुरी

२. कु. पूजा दीपक धुरी, कुडाळ, (जि.) सिंधुदुर्ग

३ अ. ‘दैनिक वितरण करतांना ‘काही वाचक दैनिक ‘सनातन प्रभात’ची पुष्कळ आतुरतेने वाट पहातात’, असे मला जाणवले. 

३ आ. मोलमजुरी करून पैसे साठवून दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी भरणारे जिज्ञासू ! : एका जिज्ञासूंना वैयक्तिक संपर्क करतांना त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगितले. त्यांची दैनिक घेण्याची इच्छा होती; पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना वर्गणी भरणे शक्य नव्हते. ‘त्यांच्या घरी पैसे मिळवणारे कुणी नसल्यामुळे त्यांनी ‘सध्या पैसे देऊ शकत नाही’, असे मला सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही माझा अर्ज भरा. मी २ मासांनी तुमचे पैसे परत करीन.’’ त्यांनी मोलमजुरी करून मिळालेल्या पैशांतून २ मासांनी स्वतःहून दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी भरली. यातून त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती असलेली आस्था दिसून आली.’

श्री. जीवन केसरकर

३. श्री. जीवन केसरकर, माडखोल, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग)

२ अ. ‘साधकांची सेवेची इच्छा जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांना लगेच सेवा देतात’, असे अनुभवणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणण्याची सेवा करायची इच्छा झाल्यावर मला ती सेवा लगेच मिळते. असे आतापर्यंत ४ – ५ वेळा झाले. यातून ‘साधकांच्या मनातील सेवेची इच्छा गुरुदेवांपर्यंत पोचते आणि लगेचच ते उत्तरदायी साधकाच्या मनात त्या साधकाला ती सेवा देण्याचे विचार घालतात. त्यातून ‘ही सेवा दैवी आहे’, असे मला जाणवते. सर्वांचे कर्ते-करविते आपणच आहात, गुरुदेव ! आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२ आ. अनुभूती : प्रवासात माझा सतत नामजप चालू असतो आणि मला वाहनामध्ये मारुतिरायांचे अस्तित्व जाणवते. (सर्व सूत्रांचा दिनांक ५.४.२०२४)

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे अभिप्राय !

१. श्री. गोपाळ गायचोर (वय ८० वर्षे), वाचक, साळगांव, कुडाळ, (जि.) सिंधुदुर्ग

१ अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून ज्ञान मिळणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र-धर्म यांविषयीचे परखड लिखाण असते आणि ते अगदी स्पष्टपणे अन् पुराव्यांसहित असते. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून मला पुष्कळ ज्ञान मिळते.’

२. श्री. रघुनाथ शेर्लेकर, साळगांव, कुडाळ, (जि.) सिंधुदुर्ग

२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आयुर्वेदानुसार आरोग्याच्या संदर्भात येणार्‍या लेखांची घरोघरी जागृती होणे आवश्यक असणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आयुर्वेदानुसार आरोग्याच्या संदर्भात येणारे लेख अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त असतात. पूर्वी माझे दात पुष्कळ दुखत होते; पण ‘सनातन प्रभात’मध्ये आरोग्याविषयी येणारे लेख वाचून त्याप्रमाणे कृती केल्यामुळे आता माझे दात दुखणे बंद झाले आहे. त्याचप्रमाणे शांत झोप लागण्यासाठी जे आयुर्वेदिक औषध सिद्ध करून वापरायला सांगितले होते, ते करून त्याचा वापर केल्याने मला काही अंशी लाभ झाला. दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि त्यात आरोग्याविषयी येणार्‍या लेखांची घरोघरी जागृती झाली पाहिजे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ५.४.२०२४)