‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या मुळाशी असा काही प्रकार नसल्याचा पुणे विद्यापीठ प्रशासनाचा दावा !

‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण !

पुणे – येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठात ‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून ७ एप्रिलला कौशल्य विकास विभागातील एका १९ वर्षीय मुसलमान विद्यार्थ्यावर आक्रमण करण्यात आले होते. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार या विद्यार्थ्यावर विद्यापिठाच्या आवारात अज्ञात विद्यार्थ्यांच्या एका गटाने आक्रमण केले आणि त्यांनी त्याच्यावर ‘लव्ह जिहाद’चा आरोपही केला होता. या प्रकरणात विद्यापिठाने आता चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर याच्या मुळाशी असा काही प्रकार नसल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ घडली होती.

पुणे विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, संबंधित मुलांची पूर्वी हाणामारी झाली, तेव्हा हा विद्यार्थी तिथे होता. त्याचा वचपा काढण्यासाठी हा प्रकार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनीही मागील काही वादातून विद्यार्थ्यांनी मुलाला मारहाण केली होती, असेच सांगितले. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी म्हणाले की, आम्ही या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. ४ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील अन्वेषण चालू आहे.

विद्यापीठ प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याचे अभाविपचे म्हणणे !

अभाविपचे प्रदेश मंत्री शुभंकर बाचल यांनी सांगितले की, हा विद्यार्थी पुणे विद्यापिठात शिकायला असून त्याला संबंधित मुलीसोबत अनेकदा पाहिले आहे. तो काही संघटनांच्या ‘रडार’वर होता. त्या संघटनांनी हा प्रकार केला आहे. यात आमचा काही संबंध नाही; मात्र विद्यापिठाने या प्रकारांमध्ये अपेक्षित भूमिका घेतली नाही. यापूर्वीही जेव्हा कारवाईची मागणी केली आहे, तेव्हा कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठ प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याने विद्यापिठाच्या आवारामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही.