पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना ‘नागीण’ ही व्याधी झाल्यावर  उपचारांच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेली अनुभूती !

आयुर्वेदाविषयी अभ्यासहीन आणि अज्ञानमूलक वक्तव्य करणे टाळणे योग्य !


‘आयुर्वेदाचा अभ्यास किंवा अनुभव नसल्यानेच ‘ते गावठी शास्त्र आहे’, असे अज्ञानमूलक वक्तव्य ॲलोपथीचे काही डॉक्टर करतात. आंग्लाळलेले भारतीयच असे संस्कृतीशून्य आणि अहितकारी दृष्टीकोन लोकांना देऊ शकतात. वास्तविक आयुर्वेद एक प्रगत शास्त्र आणि जीवनशैली असून केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगभरातील लोकांना तिचे महत्त्व ज्ञात आहे. ‘कोविडच्या महामारीत इतर देशांपेक्षा भारतियांचा लोकसंख्येच्या तुलनेने मृत्यूदर अल्प असण्याचे कारण, म्हणजे भारतियांनी अंगिकारलेली आयुर्वेदीय उपचारपद्धतीच होती’, हे या  डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदासारख्या अनमोल शास्त्राचा अपमान करण्यापूर्वी त्यांनी त्याविषयी असलेले स्वतःचे अज्ञान आणि कूपमंडूक वृत्ती दूर करून दृष्टीकोन पालटणे महत्त्वाचे अन् अनिवार्यही आहे. तरच भारतियांना वरदान लाभलेल्या धन्वन्तरि देवतेच्या या आयुर्वेदाला जगातही ऊर्जितावस्था प्राप्त होईल. सूज्ञास अधिक सांगणे न लगे !’  – संकलक   

 ‘१८.५.२०२३ पासून माझ्या उजव्या हाताला लाल रंगाचे लहान फोड येऊन हाताची बोटे आणि तळवा यांना सूज येऊ लागली. त्यासाठी मला आधुनिक वैद्य आणि होमिओपॅथी वैद्य यांनी औषधे दिली; मात्र हाताच्या वेदना आणि दाह थांबत नव्हता. २०.५.२०२३ या दिवशी मला आधुनिक वैद्यांनी सांगितले की, तुमच्या हाताला ‘नागीण’ झाली आहे आणि याला औषध नसते. ते आपोआप बरे होईल. तरीही ‘व्याधी वाढू नये’, यासाठी त्यांनी मला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि ‘अँटिव्हायरल’ औषधे दिली. या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेली अनुभूती येथे दिली आहे.

पू. शिवाजी वटकर

१. ‘नागीण’ या व्याधीसाठी नामजपाचे उपाय केल्यावर वेदना आणि दाह न होणे अन् योग्य ते आयुर्वेदीय उपचार मिळाल्याने ५ दिवसांत व्याधी बरी होणे

हाताला लहान फोड आल्यानंतर मी देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आध्यात्मिक उपाय विचारले. ‘मला नागीण झाली आहे’, असे कळल्यावर त्यांनी मला या व्याधीवरील ‘श्री दुर्गादेव्यै नम: । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन एक घंटा करण्यास सांगितला.  मी हा नामजप करू लागल्यावर गुरुकृपेने मला नागीण झाल्यावर जो प्रचंड दाह आणि वेदना होतात, त्या झाल्या नाहीत, तसेच मला योग्य ते आयुर्वेदीय उपचार मिळाले आणि माझी व्याधी ५ दिवसांत बरी झाली.

२. कुर्ला (मुंबई) येथील आयुर्वेद वैद्य संदेश चव्हाण यांचे उपचार मिळणे, गुरुकृपा अन् धन्वन्तरि देवता यांच्या कृपेने अल्प मूल्य, अल्प वेळ आणि सोप्या अन् सहज उपचार पद्धतीने बरे वाटणे

गुरुकृपेने मी माझ्या या व्याधीविषयी कुर्ला (मुंबई) येथील आयुर्वेदीय वैद्य संदेश चव्हाण यांना विचारले. त्यांनी माझ्यावर ४ दिवस उपचार केले.

अ. २२.५.२०२३ या दिवशी त्यांनी माझ्या हाताला ५ ठिकाणी जळवा लावून दूषित रक्त काढले. त्याला आयुर्वेदात ‘रक्तमोक्षण विधी’ (प्रच्छन्न कर्म किंवा ‘लीच’ थेरपी) असे म्हणतात. तेव्हा पहिल्याच दिवशी माझ्या हाताच्या वेदना आणि सूज ५० टक्यांनी उणावली.

आ. पुढील २ दिवस मला वैद्यांनी रक्तचंदन आणि गेरू माती यांचा लेप लावला. त्यामुळे मला थंडावा जाणवला आणि माझ्या हातावरील फोड सुकले.

इ. चौथ्या दिवशी माझ्या हाताला ‘सिरावेध कर्म’ (सिरींजच्या साहाय्याने दूषित रक्त काढणे) केले.

ई. वैद्यांनी मला एक आठवड्यासाठी आयुर्वेदीय औषधे दिली. त्यानंतर मला बरे वाटले.

उ. आयुर्वेदाच्या देवतेच्या, म्हणजे धन्वन्तरि देवतेच्या हातात जळू धरलेले असते. गुरुकृपा आणि धन्वन्तरि देवतेची कृपा मला अल्प वेळात, अल्प मूल्य आणि सोप्या अन् सहज उपचार पद्धतीने बरे वाटले.

३. आयुर्वेदीय उपचारांच्या वेळी जळू लावलेल्या एका जखमेतून रक्त आल्याने मलमपट्टी करण्यासाठी आधुनिक वैद्यांकडे जावे लागणे

आयुर्वेदीय वैद्यांनी माझ्या हाताला ५ ठिकाणी जळवा लावल्या होत्या. घरी आल्यावर रात्री मला जळू लावलेल्या एका जखमेतून थोडे रक्त येऊ लागले. ते वैद्य आमच्या घरापासून दूर असल्यामुळे जखमेवर मलमपट्टी (ड्रेसिंग) करण्यासाठी मी एका आधुनिक वैद्यांकडे गेलो. त्यांना मी ‘मला नागीण झाल्याने त्यावर आयुर्वेदीय वैद्यांकडून उपचार म्हणून जळवा लावल्या होत्या’, असे सांगितले.

३ अ. आधुनिक वैद्यांनी गावठी (आयुर्वेदीय) उपाय केल्यावरून रागावणे : आधुनिक वैद्य माझ्यावर रागावून म्हणाले, ‘‘तुम्ही सुशिक्षित असूनही असे कोणतेही उपचार कसे काय घेता ? तुम्ही दुसर्‍यांना ज्ञान देता आणि हे असे कसे गावठी उपचार करता ?’’ तेव्हा मी त्यांना प्रतिउत्तर दिले नाही; कारण मी आयुर्वेदाचार्य (एम्.डी. आयुर्वेद) असलेल्या वैद्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीने उपचार घेत होतो आणि त्यांना मी हे सांगितलेले आवडलेले नव्हते.

३ आ. आधुनिक वैद्यांनी ‘नागीण या रोगावर कसलेच औषध नाही’, असे सांगून अधिक क्षमतेच्या गोळ्या (ॲलोपॅथी औषधे) देणे : आरंभी आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘या रोगावर कसलेच औषध नाही.’’ तरीही त्यांनी मला ॲलोपॅथीचे अँटिव्हायरल औषध दिले. त्यांनी मला ८०० मि.ग्रॅ. क्षमतेच्या गोळ्या दिल्या आणि प्रत्येक ४ घंट्यांनी एक गोळी घेण्यास सांगितले. तसेच प्रत्येक पुडीत ६ वेगवेगळ्या गोळ्या (२ कॅप्सूल्स आणि ४ गोळ्या) असलेल्या ६ पुड्या दिल्या. ‘ही औषधे २ दिवसांत संपवून दुसरीकडे कुठेही न जाता मला पुन्हा दाखवायला या’, असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांचे ५५० रुपयांचे देयक दिले; परंतु ‘ॲलोपॅथी औषधांचा दुष्परिणाम (साईड इफेक्ट) माझ्या शरिरातील इतर अवयवांवर होऊ शकतो’; म्हणून मी त्यांनी दिलेली ॲलोपॅथीची औषधे घेण्याचे टाळले.

३ इ. आधुनिक वैद्यांनी ‘हा रोग संसर्गजन्य असल्याने रुग्णाचे कपडे वेगळे ठेवून त्यांच्या संपर्कात कुणीच येऊ नये’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या हाताला मलमपट्टी करतांना ‘हँड ग्लोव्ह्ज’ घातले होते. ते माझ्या समवेत आलेल्या नातेवाइकांना म्हणाले, ‘‘हा रोग संसर्गजन्य असल्याने यांचे कपडे वेगळे ठेवावेत. त्यांच्या संपर्कात कुणीच येऊ नये.’’ त्यानंतर घरी माझी एका वेगळ्या खोलीत रहाण्याची व्यवस्था करण्यात आली.

३ ई. आयुर्वेदीय वैद्यांनी ‘हा विषाणू संक्रमणशील नसून तुम्हाला अलगीकरणाची आवश्यकता नाही’, असे सांगणे : दुसर्‍या दिवशी मी आयुर्वेदीय वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी माझ्या हातावर मलमपट्टी (ड्रेसिंग) केली आणि ते मला म्हणाले, ‘‘ही नागीण व्याधी, म्हणजे हर्पिस झोस्टर (herpes zoster) नावाची व्याधी आहे. याचा विषाणू संक्रमणशील नाही. तसे असते, तर मी तुम्हाला हात लावला नसता. मी केवळ मलमपट्टी करतांनाच ‘हँड ग्लोव्ह्ज’ घातले होते. तुम्हाला अलगीकरणाची आवश्यकता नाही.’’

३ उ. आधुनिक वैद्यांनी आयुर्वेदीय औषधोपचारावर टीका करून धन्वन्तरि देवतेचा अवमान करणे : जेव्हा मी हाताच्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी आधुनिक वैद्याकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी आयुर्वेदीय औषध उपचारावर टीका केली. तेव्हा ‘एखाद्या विषयाचा अभ्यास नसतांना टीका करणे अयोग्य आहे’, असे मला वाटले. त्यांचे बोलणे, म्हणजे विष्णूचा अवतार असलेल्या आयुर्वेदाची देवता धन्वन्तरि हिचा अवमान होता; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने मी त्यांना काही बोलू शकलो नाही.

४. धन्वन्तरि देवतेच्या कृपेने आयुर्वेदीय उपचारांमुळे ‘नागीण’ रोग शरिरामध्ये इतरत्र न पसरणे आणि त्याची दाहकता अन् वेदना मर्यादित रहाणे

आयुर्वेदानुसार वैद्यांनी केलेले ‘रक्तमोक्षण’ हा उपचार ‘नागीण’ या व्याधीवर अत्यंत प्रभावशाली होता’, असे मी अनुभवले. त्यामुळे ‘नागीण’ रोग माझ्या शरिरामध्ये इतरत्र पसरला नाही. त्याचप्रमाणे त्याची दाहकता आणि वेदनाही मर्यादित राहिल्या. मला पुष्कळ अल्प त्रास झाला. यातून ‘धन्वन्तरि देवतेने माझ्यावर कृपा केली’, याची मला जाणीव झाली.

५. कृतज्ञता

धन्वन्तरि देवतेच्या हातांमध्ये शंख, चक्र, अमृतकुंभ आणि जळू आहे. त्या सात्त्विक जळूनेच माझे ‘रक्तमोक्षण’ केले आणि मला ‘नागीण’ या गंभीर व्याधीतून बाहेर काढले. त्यासाठी मी साक्षात् विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, धन्वन्तरि देवता आणि आयुर्वेदीय वैद्य यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक