पाणीपुरवठा कर्मचारी रात्रीपाळी न करता झोपल्याचा परिणाम
नवी मुंबई – कोपरखैरणे येथे रात्रपाळीवर असणारे पाणीपुरवठा कर्मचारी रात्री झोपले असतांनाच वाहिनीचा मुख्य व्हॉल्व तुटला. परिणामी कार्यालयालगत असलेल्या ३ टाक्यांमधील लाखो लिटर पाणी चाळीत शिरले. तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. काही रहिवाशांनी पाणी पुरवठा कार्यालयात जाऊन कर्मचार्यांना उठवले. त्यानंतर त्यांनी पाणी बंद केले; पण तरीही सकाळी ११ पर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता. तळमजल्यावरील सर्वांच्या घरात पाणी शिरले. जी घरे पुष्कळ सखल आहेत, अशा घरात गुडघाभर पाणी शिरले होते.
१. कार्यालयात पाणीपुरवठा कर्मचारी आळीपाळीने उपस्थित असतात; पण अनेकदा रात्रपाळीचे कर्मचारी कर्तव्य न बजावता झोपतात.
२. पहाटे ४ वाजता मुख्य वाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आल्याने पाण्याच्या दबावाने व्हॉल्व तुटला. तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली.
३. ‘कर्मचार्यांकडून चूक झाल्याने ही परिस्थिती ओढवली असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. व्हॉल्वची दुरुस्ती केली जाईल आणि अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये; म्हणून काळजी घेतली जाईल’, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा कर्मचार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ? |