४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची वर्धापनदिनाची भेट ! – मंत्री रवींद्र चव्हाण

भाजपच्या वर्धापनदिनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार  

दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण

रत्नागिरी – भाजपच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त ६ एप्रिलच्या सकाळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयात जनसंघ, भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या ज्येष्ठ मंडळींनी विद्यमान पदाधिकार्‍यांना आशीर्वाद द्यावेत, मार्गदर्शन करावे, पक्ष वाढण्यासाठी साहाय्य करावे. लोकसभा निवडणूक कमळाच्या निशाणीवर लढवली गेली पाहिजे, अशी आपल्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन भाजप नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार बाळ माने म्हणाले की, ६ एप्रिल १९८० या दिवशी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपची स्थापना झाली. ‘सूरज उगेगा कमल खिलेगा’ असे वाजपेयी म्हणाले होते. आज भाजपची घोडदौड चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची शक्ती वाढत आहे. भाजपचे कोकणातील खासदार प्रेमजीभाई आसर, अधिवक्ता बापूसाहेब परुळेकर यांच्यानंतर कमळ निशाणीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आज पुन्हा संकल्प करूया.

याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन केला. यामध्ये दादा देशमुख, श्रीमती म्हापुसकर, प्रकाश सोहनी, मोहन दामले, ॲड. विलास पाटणे, ॲड. बाबा परूळेकर, शिल्पाताई पटवर्धन, ॲड. धनंजय भावे, ॲड. रंजना भावे, अरविंद कोळवणकर, सुनिता पाटणकर, विजय पेडणेकर, सुभाष राणे, दिगंबर घैसास, आनंद तथा नाना मराठे, अनंत मराठे, अशोक मयेकर, प्रकाश सुवरे, संजय कोळेकर, शेखर लेले, उमेश खंडकर, ॲड. भाऊ शेट्ये, दादा मांडवकर, सुधीर पाथरे, सुभाष पोतकर, बंडू दाते, सुरेखा गांगण, श्रीमती केळकर, श्री. वाडकर, अनंत कलये, दत्ता देसाई, विकास सावंत, मोहन पटवर्धन आदींसह ५० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.