म्हापसा, ६ एप्रिल (वार्ता.) : देहलीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारावे; मात्र मत केवळ ‘झाडू’ या चिन्हाला (झाडू हे ‘आप’चे चिन्ह) द्यावे’, असे आवाहन केले होते. म्हापसा टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या प्रचारसभेत हे वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात लाचखोरीसंबंधी तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार म्हापसा न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने लाचखोरीसंबंधी या तक्रारीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण नसल्याचे सांगत ही तक्रार फेटाळली आहे.
तत्कालीन निवडणूक अधिकारी गुरुदास देसाई यांनी २२ डिसेंबर २०१७ या दिवशी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. म्हापसा पोलीस ठाण्यातही याविषयी तक्रार प्रविष्ट झाली होती.