‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचे वास्तविक स्वरूप जनतेसमोर येणे आवश्यक !

‘आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) अरविंद केजरीवाल हे चरित्र जेवढे मी समजू शकलो, तेवढे कुणीही समजू शकले नाही. तेव्हा माझ्यावर कुणीही विश्वास ठेवायला सिद्ध नव्हते. त्याला माझे कुटुंबही अपवाद नव्हते. मी ३ गुप्तचर संस्थांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे कोणते स्रोत कार्यरत आहेत, हे मला लवकर लक्षात येतात. याविषयी मी अतिशय संवेदनशील असल्याने केजरीवाल यांचे तेव्हाच खरे स्वरूप समजले होते. ते देहलीची निवडणूक लढवत होते. तेव्हा मी फार अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे मला रात्रभर झोपही आली नाही; कारण मला माहिती होते की, ते निवडणूक जिंकणार आहेत. त्या वेळी मी ‘या देशाचे काय होईल’, या चिंतेने अस्वस्थ झालो होतो. त्याच दिवशी सकाळी मला एका पत्रकाराचा दूरभाष आला. त्याला अरविंद केजरीवाल यांच्या विदेश प्रवासाविषयी माझ्याशी वार्तालाप (मुलाखत) करायचा होता. हा वार्तालाप मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. जोपर्यंत मी एखादी गोष्ट पहात नाही, अभ्यासत नाही, विश्लेषणाने एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवत नाही.

कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

१. योगगुरु रामदेवबाबा यांचे काळ्या पैशाच्या विरोधातील आंदोलन दडपण्यासाठी काँग्रेसकडून अण्णा हजारे यांचा वापर !

वर्ष २०११ मध्ये लोकपाल आंदोलन करतांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने अटक केली होती. त्यांना तिहार कारागृहामध्ये ठेवण्यात येणार होते. हा तो काळ होता, जेव्हा काँग्रेसप्रणित केंद्र सरकारचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघड होत होते. ते सर्व घोटाळे सहस्रो कोटी रुपयांच्या घरात होते. तेव्हा मला संशय आला की, या संपूर्ण आंदोलनामध्ये अण्णा हजारे यांनी अनेकांची नावे घेतली; पण सोनिया गांधी यांचे नाव कधीच का घेतले नाही ? त्या दिवसांमध्ये योगगुरु रामदेवबाबा यांनी देशाबाहेर असलेल्या भारतीय शासनकर्त्यांचा काळा पैसा देशात परत आणण्याविषयी मोठे आंदोलन उभे केले होते. रामलीला मैदानावर पोलिसांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यातून रामदेवबाबा यांनी कशीबशी सुटका करून घेतली होती. या घटनेविषयी हजारे यांनी कधीच तोंड उघडले नाही. बाबा रामदेव यांच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच अण्णा हजारे यांना उपोषणास बसवण्यात आले होते आणि ते बसले. त्या एक मासाच्या काळात या विदेशी महिलेने (सोनिया गांधी यांनी) त्यांच्या सर्व काळ्या पैशाची विल्हेवाट लावली.

२. लोकपाल आंदोलनामध्ये केजरीवाल यांच्यावर प्रकाशझोत ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

अण्णा हजारे तिहार कारागृहात येणार होते. तेव्हा त्यांच्या समवेत केजरीवालही होते. त्या वेळी देहलीच्या हरिनगरमधून एक आणि जनकपुरीतून दुसरा जमाव येत होता. ते सर्व जण ‘देश का बेटा कैसा हो, केजरीवाल जैसा हो’, ‘देश की बेटी कैसी हो, किरण बेदी जैसी हो’, अशा घोषणा देत होते. तेव्हा ते कुणाला तरी पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा मला संशय आला. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ संघटनेत अनेक प्रमुख नेते होते; पण कार्यकर्ते त्यांचे नावही घेत नव्हते. त्यामुळे त्यांची चाचणी घेण्यासाठी मी ‘रामदेवबाबा जिंदाबाद’, अशी घोषणा दिली. तेव्हा तेथे एकदम शांतता पसरली. वास्तविक तेही भ्रष्टाचाराच्या विरोधातच आंदोलन करत होते. मी २-३ वेळा घोषणा दिल्या. तेव्हा स्वामीजींचा एक अनुयायी आला आणि म्हणाला, ‘‘बाबाजी ३ वाजता येणार आहेत, तेव्हा आपण घोषणा देऊया.’’ तेव्हा संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आले.

३. भारतातील कारवायांसाठी केजरीवाल यांना विदेशी आर्थिक साहाय्य !

प्रतिकात्मक छायाचित्रं

केजरीवाल यांच्याविषयी संशय बळावल्यानंतर मी त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करणे चालू केले. त्यातून मला समजले की, पहिल्या निवडणुकीच्या वेळी ते दुबईला गेले होते. तेथे त्यांनी दाऊच्या लोकांकडून वर्गणी घेतली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तेथील लोकांकडूनही वर्गणी घेतली. अण्णा हजारे यांचे आंदोलन हे ‘अरब स्प्रिंग’ची चालत आलेली मोहीम होती. (‘अरब स्प्रिंग’ म्हणजे वर्ष २०१० मध्ये मध्य-पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका यांमध्ये श्रृंखलाबद्ध विरोध प्रदर्शन करणे आणि धरणे आंदोलन यांचा काळ चालू होता.) त्या वेळी संपूर्ण जगभर ‘अरब स्प्रिंग’ चालू होते. मी ‘मेगासेस पुरस्कार’ समारंभाला गेलो होतो. वर्ष २०१४ मध्ये माझे ‘भारताचे अंतर्गत शत्रू’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात केजरीवाल आणि अन्यांविषयी विस्तृत माहिती दिली आहे. या पुस्तकात अनेक कागदपत्रे उघड करतात की, कशा प्रकारे ‘सीआयए’ने (अमेरिकी गुप्तचर संस्थेने) या ‘मेगासेसे’ पुरस्काराला ‘इन्स्टिट्यूट’ (प्रायोजकत्व) केले होते आणि यामागे त्यांचे हेतू काय होते ? हे सर्व या पुस्तकात दिले आहे.

केजरीवाल यांनी स्वयंसेवी संस्था काढली होती. त्या माध्यमातून बाहेरून पैसे गोळा केले. यात मनीष सिसोदिया, योगेंद्र यादव, अभय दुबे या सर्वांची नावे आहेत. तेव्हापासून आजपर्यंत मी केजरीवाल यांना कुणीतरी आव्हान द्यावे, याची प्रतीक्षा करत होतो. या लोकांचा  ‘अरब स्प्रिंग’शी संबंध आहे. काही लोक २ रुपयांची वीज वाचवण्यासाठी आणि मोफत पाणी मिळवण्यासाठी केजरीवालसारख्यांना निवडून देतात, हे देशाचे दुर्दैव आहे. त्या काळात केजरीवाल यांची फार मोठी हवा निर्माण करण्यात आली होती. तेव्हा कुणीही माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सिद्ध नव्हते.

सोनिया गांधी यांच्या विरोधात घोटाळ्यांविषयी जनतेत असंतोष बनत चालला होता, त्यापासून लोकांचे लक्ष भरकटवणे आणि सोनिया गांधींची ‘बी टीम’ म्हणून नवीन पक्ष काढणे, हा केजरीवाल यांचा पहिला उद्देश होता. याविषयी सर्व काँग्रेस पक्षाला माहिती नव्हती. हा केवळ काँग्रेसच्या ‘कोअर ग्रुप’चा (वरिष्ठ गटाचा) उपक्रम होता. सोनिया गांधींच्या या उपक्रमात शीला दीक्षित याही सहभागी होत्या. त्या वेळी देहलीत सर्व रिक्शांवर ‘शीला दीक्षित बेईमान केजरीवाल इमानदार’ हे फलक लावण्यात आले होते. असे असतांनाही त्यांचा मुलगा संदीप दीक्षित यांनी याविरोधात काहीच कारवाई केली नाही. त्यांच्या देहली विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी देश-विदेशातून आलेले स्वयंसेवी कार्यकर्ते भूमीगत राहून नियोजनपूर्वक काम करत होते. त्या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे २८ आमदार निवडून आले होते. मोदी यांनी वेळीच प्रचारात उडी घेतली नसती, तर ती संख्या ४२ पर्यंत गेली असती. तेव्हा काँग्रेसमुळे त्यांचे सरकार बनले.

त्यानंतर मिळालेल्या सूचनेप्रमाणे मोदी यांना थोपवण्यासाठी त्यांच्या विरोधात केजरीवाल यांनी वाराणसी येथून निवडणूक लढवली. त्यासाठी तेथे २२ स्वयंसेवी संस्था आधीच सिद्ध होत्या. त्यांना माहिती होते की, मोदी परत निवडून आले, तर देशाची दिशा पालटून जाईल. तेथे केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर काही विनामूल्य गोष्टींसाठी देहलीच्या लोकांनी त्यांना परत निवडून दिले.

४. केजरीवाल यांची व्यापक दृष्टीकोनातून चौकशी होणे आवश्यक !

पंजाबच्या मागील निवडणुकीत केजरीवाल यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’कडून १ सहस्र ४०० कोटी रुपये मिळाले. त्यांचा सीमावर्ती राज्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. पंजाब, गुजरात, राजस्थान, गोवा या सीमावर्ती राज्यांवर केजरीवाल यांचे लक्ष आहे. एकदा ‘इंडिया टुडे’ कॉन्क्लेव्ह मध्ये त्यांना पोचण्यात अडचण आली, तेव्हा त्यांच्यासाठी मोठे चार्टर्ड विमान पाठवण्यात आले होते. या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये त्यांच्याशी वार्तालाप करतांना ‘तुम्हाला देहलीला यायचे आहे का ?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

केजरीवाल यांचा नेहमीच ‘टुकडे टुकडे टोळी’मध्ये (देशाचे तुकडे करू पहाणारा साम्यवाद्यांचा गट) सहभाग राहिला. शाहीनबागमध्येही त्यांचा सहभाग होता, राष्ट्रविरोधी वक्तव्य करणार्‍या शरजील इमामला समर्थन देण्यातही ते पुढे होते. वक्फ बोर्डाला ११० कोटी रुपये देणारे, बाटला हाऊस चकमकीला चुकीचे म्हणणारे, पाकिस्तानवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ला (सैनिकी कारवाईला) खोटे ठरवणारे हेच केजरीवाल होते. त्यांना सीमेपलीकडून संदेश आला होता. त्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक खोटी ठरवून पुरावे दाखवण्याची मागणी केली होती. अशी चरित्रहीन व्यक्ती भारताच्या सैन्याला पुरावे मागत होती.

‘केजरीवाल यांचे साधे रहाणीमान हा मुखवटा आहे’, हे त्यांच्या बंगल्यावरून दिसून येते. ते किती बहुरूपी आहेत, हे लक्षात घ्या. शेतकरी आंदोलक देहलीकडे कूच करत होते, त्यालाही केजरीवाल हेच कारणीभूत होते. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर गोंधळ माजवण्यात या व्यक्तीची फार मोठी भूमिका होती. केजरीवाल यांच्या टोळीतील सर्व जण ‘अर्बन (शहरी) नक्षलवादी’ आहेत. ‘गूगल’वर शोध घेतला, तर त्या सर्वांची पार्श्वभूमी माओवादी असल्याचे दिसेल.

त्यांनी पंजाब पोलिसांच्या माध्यमातून त्यांचे एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास यांच्या घरी छापा टाकला होता. ही व्यक्ती मुलांची, पित्याची, मित्राची आणि देशाचीही होऊ शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीविषयी कोणतीही सहानुभूती ठेवू नये, असे मला वाटते. ‘खलिस्तान बनले, तर बनू द्या. मी तेथील पंतप्रधान बनेल’, असे या व्यक्तीने म्हटले होते. या व्यक्तीच्या विरुद्ध यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते. त्यांचे पापाचे जाळे संपूर्ण देशाच्या कानाकोपर्‍यात विणलेले आहे. त्यांनी चर्चचे साहाय्य घेतले आहे. त्यांनी मागील निवडणुकीच्या वेळी चर्चवर नियोजनपूर्वक आक्रमण करवले. त्यांचे खलिस्तान्यांशीही संबंध आहेत. काँग्रेसची सत्ता असतांना सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांना पत्र लिहिले होते, ‘या अधिकार्‍याला देहलीच्या बाहेर रुजू करू नये.’ मद्य घोटाळ्याची तक्रार करणारे काँग्रेसवाले होते आणि आज तेच यांच्या समवेत उभे आहेत.

त्यामुळे सध्याच्या प्रकरणाची केवळ अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) दृष्टीकोनातून चौकशी न होता अधिक सखोल चौकशी व्हावी. या चौकशीत ‘रॉ’ आणि ‘आयबी’  (दोन्ही गुप्तचर संघटना) यांचेही अधिकारी सहभागी असले पाहिजेत. त्यांना हात लावण्याचीही आवश्यकता भासणार नाही. ते त्यांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध, भारताच्या शत्रूशी असलेले संबंध इत्यादींविषयी सर्व माहिती सांगतील. त्यामुळे त्यांचे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांच्या दृष्टीकोनातून योग्य प्रकारे अन्वेषण होणे आवश्यक आहे.’

– कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, माजी गुप्तचर अधिकारी आणि भारतीय संरक्षण तज्ञ (साभार : ‘पब्लिक २४x७’ यू ट्यूब चॅनेल)