२ एप्रिल या दिवशी आपण या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/779938.html
८. प.पू. डॉक्टर एक मानसोपचार तज्ञ असून त्यांना चित्र काढण्याचा अनुभव नसतांनाही ते चित्रातील बारकावे अचूकतेने सांगत असलेले पाहून त्यांच्याबद्दल अभिमान वाटणे
त्या काळी ठिकठिकाणी घेण्यात येणार्या प्रवचनांच्या समवेतच काही ठिकाणी सार्वजनिक सभांचे आयोजन करण्यात येणार होते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून व्यासपिठाच्या मागे लावण्यासाठी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे मोठे चित्र काढण्यात येत होते. वर्ष १९९६ च्या शेवटी त्या सेवेला आरंभ झाला. ती सेवा करण्यासाठी चित्रकलेचे शिक्षण घेतलेली एक साधिका येत होती. ते चित्र परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने प.पू. डॉक्टर त्या साधिकेला मार्गदर्शन करायचे. त्या वेळी माझ्या मनात यायचे, ‘प.पू. डॉक्टर तर एक मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांना चित्र काढण्याचा अनुभव नाही, तरीही ते चित्रातील बारकावे अचूकतेने सांगतात.’ ते पाहून मला त्यांचा पुष्कळ अभिमान वाटायचा.
९. खोलीत विश्रांतीला जातांना प.पू. डॉक्टरांनी ‘साधक आल्यावर उठवा’, असे सांगणे, त्यानुसार साधक आल्यावर त्यांना हाक मारून दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करणे, ईश्वराला शरण जाऊन प्रार्थना केल्यानंतर प.पू. डॉक्टर उठणे आणि ‘ईश्वराला शरण गेलो की, प्रत्येक समस्येचे निराकरण होते’, हे शिकायला मिळणे
एकदा एका साधकाच्या समवेत प.पू. डॉक्टरांना बोलायचे होते; परंतु काही कारणास्तव तो साधक वेळेत पोचू शकला नाही. त्या वेळी प.पू. डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘मी जरा झोपतो. तो साधक आला की, मला उठवा.’’ नंतर काही मिनिटांतच तो साधक आल्यामुळे मी प.पू. डॉक्टरांना उठवायला गेले. तोपर्यंत प.पू. डॉक्टरांना झोप लागली होती. ‘त्यांना कसे उठवायचे ?’, ते मला कळत नसल्यामुळे मी त्यांना हळूच हाक मारली; परंतु प.पू. डॉक्टरांकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ‘काय करावे ?’, हे मला सुचत नव्हते. मी ईश्वराला शरण जाऊन प्रार्थना केली, ‘मला गुरुदेवांचे आज्ञापालन करायचे आहे; मात्र ‘त्यांना कसे उठवायचे ?’, हे मला कळत नाही. यातून तूच मार्ग दाखव.’ प्रार्थना करून मी जड अंतःकरणाने खोलीतून बाहेर जायला निघाले. मी दरवाज्याजवळ पोचले. तेवढ्यात प.पू. डॉक्टर उठून बसले आणि मला विचारले, ‘‘तो साधक आला का ?’’ ‘आपण ईश्वराला शरण गेलो की, प्रत्येक समस्येचे निराकरण होते’, हे मी या प्रसंगातून शिकले.
१०. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने देहबुद्धी अल्प असल्यामुळे मंदिराच्या बाहेर बसणारे भिकारी किंवा चपलांची व्यवस्था पहाणारे लोक यांच्या समवेत बसून सेवा करणे
त्या वेळी ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी आमच्याकडे टेबल आणि आसंद्या उपलब्ध नसायच्या. त्यामुळे आम्ही आमच्या चपला काढून त्यावरच बसून ग्रंथांचे प्रदर्शन लावायचो. काही वेळा मंदिराच्या बाहेर बसणारे भिकारी किंवा मंदिरात दर्शनाला येणार्यांच्या चपलांची व्यवस्था पहाणारे लोक यांच्या समवेत बसून आम्ही सेवा करायचो. हळूहळू त्यांच्यात आणि आमच्यात आपुलकी निर्माण झाल्याने मंदिरात गर्दी असलेल्या वेळी ते आमच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायचे.
हे सर्व प.पू. डॉक्टरांच्या शिकवणीमुळेच आम्हाला शक्य झाले. ते आम्हा सर्व साधकांना समान वागणूक देत असत. आम्हालाही कधी आपापसांमधे जातीची अडचणही आली नाही.
११. केवळ प.पू. डॉक्टरांच्या साधकांप्रती असलेल्या प्रीतीमुळेच साधनेत टिकून रहाणे आणि प.पू. डॉक्टर स्वतः ईश्वरस्वरूप असून त्यांच्यातील चैतन्यच एखाद्यात पालट घडवून आणू शकत असल्याचे अनुभवणे
केवळ प.पू. डॉक्टरांची साधकांवर पुष्कळ प्रीती आहे. त्यामुळेच आम्ही उभयता साधनेत टिकून आहोत. कधी कधी मी नकारात्मक स्थितीत असतांना किंवा माझ्याकडून साधनेचे पुरेसे प्रयत्न होत नसतील त्या वेळी, मला प.पू. डॉक्टरांसोबतचे प्रसंग आठवतात किंवा माझे यजमान श्री. सुदीश यांचा भ्रमणभाष येतो आणि ते प.पू. डॉक्टरांविषयी घडलेला एखादा प्रसंग किंवा प.पू. बाबांच्या संदर्भातील प्रसंग मला सांगतात. त्यामुळे माझी स्थिती सकारात्मक होऊन माझे साधनेचे प्रयत्न पूर्ववत् होतात. केवळ प.पू. डॉक्टरांचा विचारच आमच्या साधनेची घडी बसवण्यास पुरेसा आहे. यातून हेच सिद्ध होते की, प.पू. डॉक्टर स्वतः ईश्वरस्वरूप असून त्यांच्यातील चैतन्यच एखाद्यात पालट घडवून आणू शकते.
१२. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा घेतलेल्या निर्णयाला दोन्ही कुटुंबांतील व्यक्तींकडून पुष्कळ विरोध होणे; मात्र ‘एवढी वर्षे संस्थेत टिकून राहिल्यामुळे निश्चितच त्यात काहीतरी चांगले असावे’, असे आता त्यांना वाटणे
आम्हाला पूर्णवेळ साधना करता यावी, यासाठी आम्ही दोघांनीही एप्रिल २००० मध्ये मुंबई येथील नोकरी सोडून केरळ येथे स्थानांतरीत होण्याचे ठरवले. त्यानुसार आम्ही केल्यावर आम्हाला दोन्ही कुटुंबांतील व्यक्तींकडून पुष्कळ विरोध झाला. प्रत्यक्षात मी आणि श्री. सुदीश आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. आमच्या या निर्णयामुळे घरात नेहमी वाद-विवाद होत असत. ‘आम्हाला एक मुलगा असतांनाही आम्ही असा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकतो ?’, असे त्यांना वाटायचे. मी नोकरी सोडून साधना करत असल्यामुळे माझा भाऊ अजूनही माझ्याशी बोलत नाही. माझ्या दिरांनीही (श्री. सुदीश यांचे मोठे भाऊ यांनीही) आरंभी पुष्कळ विरोध केला. नंतर त्यांना वाटायचे, ‘काही वर्षांनंतर ‘आमचा निर्णय चुकला आहे’, हे आमच्या लक्षात येऊन आम्ही परत येऊ’; परंतु तसे न घडल्यामुळे आता त्यांना वाटते, ‘एवढी वर्षे आम्ही संस्थेत टिकून आहोत, तर निश्चितच त्यात काहीतरी चांगले असावे.’
१३. ‘साधनेला आरंभ केला नसता, तर जीवनातील प्रसंगांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकले नसते आणि स्वतः ध्येयहीन व्यक्ती बनले असते’, असे जाणवणे
मी पूर्णवेळ साधना न करता नोकरी करण्याचा निर्णय घेतला असता, तर आतापर्यंत माझा अहं पुष्कळ वाढला असता. तसेच जीवनात येणार्या प्रसंगांना मी योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकले नसते. माझ्या इतर मैत्रिणींप्रमाणे वस्तू खरेदी करणे, पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, वेगवेगळ्या उपाहारगृहांत जाऊन जेवणे, बाहेरचे अन्न घरी मागवणे, अशा प्रकारे माझेही जीवन झाले असते. मी संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे ?’, ते मला ठाऊकच नव्हते. प्रतिदिन जेवण बनवणे, कामावर जाणे, मुलाचा सांभाळ करणे, खाणे, झोपणे आणि दुसर्या दिवशी पुन्हा तेच करणे, हेच माझे जीवन होते. मी साधनेला आरंभ केला नसता, तर मी ध्येयहीन व्यक्ती बनले असते.
१४. कृतज्ञता
प.पू. गुरुदेव, या लिखाणाच्या माध्यमातून मुंबई सेवाकेंद्रात घालवलेले आनंदाचे क्षणमोती तुम्ही जिवंत केल्याबद्दल मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. या लिखाणाला आरंभ करण्यापूर्वी प.पू. गुरुदेवा, मी आपल्या चरणी प्रार्थना केली होती, ‘हे लिखाण वाचणारे आणि साधक यांना त्याचा लाभ होईल’, असे प्रसंग मला आठवू दे.’ त्यानुसार आवश्यक त्या घटना मला आठवल्या आणि मी त्या पुन्हा अनुभवल्या. प.पू. गुरुदेवा, माझा हात धरून तुम्ही मला पुढे पुढे घेऊन जात आहात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. साधनेच्या वाटचालीत माझी पावले लहान असली, तरी तुम्हीच मला तुमचे हात घट्ट धरून ठेवण्यास साहाय्य करत आहात. मला निराशा आलेल्या वेळी तुम्हीच मला सेवा करण्यासाठी आणि तुम्हाला धरून ठेवण्यासाठी ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करत असता. त्या सर्वांसाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. कृतज्ञतापुष्पांच्या स्वरूपातील हे लिखाण मी तुमच्या चरणी समर्पित करत आहे.’
– सौ. सुमा पुथलत (वय ६२ वर्षे), केरळ
(२१.२.२०२४)
(समाप्त)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |