केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेला जातांना शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. प.पू. डॉक्टरांची झालेली पहिली भेट

सौ. सुमा पुथलत

‘नोव्हेंबर १९९३ मध्ये मी आणि माझे यजमान श्री. सुदीश पुथलत प.पू. डॉक्टरांचे प्रवचन ऐकण्यासाठी मुंबई येथील ‘रुइया कॉलेज’मधे गेलो होतो. प्रवचन झाल्यानंतर प.पू. डॉक्टर उपस्थितांना उद्देशून म्हणाले, ‘‘कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारावे.’’ तेव्हा माझ्या मनात पुढील शंका होत्या, ‘केरळमधे माहेरच्या कुलदेवतेचे नामस्मरण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मी कोणत्या देवतेचा नामजप करू ? तसेच मी ख्रिस्ती पंथाची असल्यामुळे मला कोणता नामजप करायला हवा ?’ या शंका विचारण्यासाठी मी माझा हात वर केला. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला व्यासपिठावर यायला सांगितले. मी व्यासपिठाकडे जात असतांना मला ‘प.पू. डॉक्टरांकडून माझ्याकडे तेजस्वी प्रकाश येत आहे’, असे जाणवले. त्या दिवसापासून प.पू. डॉक्टरांपासून दूर जाण्याचा विचार माझ्या मनात कधीच आला नाही.

२. प.पू. डॉक्टरांची साधकांप्रती असलेली प्रीती पाहून त्यांच्याकडे आकर्षित होणे

त्यानंतर आम्ही प.पू. डॉक्टरांच्या ठाणे येथे असलेल्या प्रवचनासाठी गेलो होतो. प्रवचन झाल्यानंतर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘कुणाला सेवा करायची इच्छा असेल, ते मुंबई येथील सेवाकेंद्रात येऊ शकतात.’’ दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही उभयता आनंदाने तेथे गेलो. सेवाकेंद्रात असलेल्या सर्व साधकांप्रती प.पू. डॉक्टरांची असलेली प्रीती पाहूनच आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो. त्यांच्या सहवासात आम्हाला पुष्कळ सुरक्षित वाटत होते.

३. कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व समजल्यावर त्वरित नामजपाला आरंभ करणे, कुलदेवता ठाऊक नसल्याने प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आवडत्या देवाचा, म्हणजे शिवाचा नामजप करणे

मी ख्रिस्ती कुटुंबातून आले असल्याने माझ्या माहेरच्या लोकांना ‘मी त्यांच्या पंथानुसार आचरण करायला हवे’, असे वाटायचे. मी मात्र माझ्या सासरच्या हिंदु कुटुंबाप्रमाणे आचरण करत होते. प.पू. डॉक्टरांचे प्रवचन ऐकल्यावर मला कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व समजले आणि मी त्वरित नामजप करायला आरंभ केला. केरळ येथील इतर लोकांप्रमाणे आम्हालाही आमची कुलदेवता कोण आहे ? याविषयी ठाऊक नव्हते. येथील सर्व जण श्रीराम किंवा शिव यांची भक्ती करतात. मी प.पू. डॉक्टरांना ‘कोणता नामजप करू ?’, असे विचारले असता, ‘तुम्हाला जो देव आवडतो, त्या देवाचा नामजप करा’, असे त्यांनी सांगितले. मला शिवाची भक्ती करायला आवडत असल्यामुळे मी शिवाचा नामजप करत होते. काही वर्षांनंतर एका साधिकेने मला सांगितले, ‘‘गेल्या जन्मी तू शिवभक्त होतीस’, असे प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले.’’

४. प.पू. डॉक्टर प.पू. बाबांच्या शेजारी उभे राहून प्रत्येक साधकाची ओळख करून देणे आणि त्यांच्या या कृतीमुळे ‘साधकाची ओळख कशी करून द्यावीे ? ते शिकता येणे

वर्ष १९९३ मधे प.पू. डॉक्टरांच्या निवासस्थानी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांना बोलावले होते. प.पू. बाबांचे दर्शन आम्ही प्रथमच घेणार होतो. प.पू. बाबांचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे भक्तही आले होते. त्या सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर प.पू. बाबांनी साधकांना दर्शनासाठी घेऊन येण्यास प.पू. डॉक्टरांना सांगितले. त्या वेळी प.पू. डॉक्टर प.पू. बाबांच्या शेजारी उभे राहून प्रत्येक साधकाची ओळख करून देत होते. त्या वेळी ‘एक पिता आपल्या लाडक्या मुलांची अतिशय प्रेमाने ओळख करून देत आहे’, असे मला जाणवले. प.पू. डॉक्टरांच्या या कृतीमुळे ‘समाजातील व्यक्तींसमोर साधकांची ओळख कशी करून द्यावी ? किंवा समाजातील व्यक्ती आश्रमात आल्यानंतर त्यांची ओळख कशी करून द्यावी’, हे आम्ही शिकलो.

५. प.पू. बाबा झोपलेले असतांना त्यांच्या चरणांवर डोके ठेवण्यासाठी वाकले असतांना स्वतःचा अन् सभोवतालचा विसर पडणे, तेव्हा ‘संत झोपलेले असतांना त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य आपल्याला सहन होत नाही’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

एकदा प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबई येथील सेवाकेंद्रात आले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी आम्हाला बोलावले होते; परंतु आम्ही तेथे पोचेपर्यंत प.पू. बाबा झोपले होते. प.पू. बाबा दुसर्‍या दिवशी पहाटे तेथून निघणार असल्यामुळे प.पू. डॉक्टरांनी आम्हाला ते झोपलेले असतांनाही त्यांना नमस्कार करायला सांगितले. मी प.पू. बाबांच्या चरणी डोके टेकवण्यासाठी वाकले आणि मला स्वतःचा अन् सभोवतालचा विसर पडला. त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी हळूच हाक मारून मला उठायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संत झोपलेले असतांना त्यांच्या चरणांतून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने उच्च कोटीच्या आध्यात्मिक अनुभूती येतात.’’

६. प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

६ अ. प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई कोणताही भेदभाव न करता सर्व साधकांची अतिशय प्रेमाने काळजी घेत असल्यामुळे तोच प्रेमभाव आम्हा साधकांमधे रुजला जाणे : मी लहानपणापासून आणि लग्न झाल्यानंतरही पहात आले आहे, ‘कुटुंबामधे पुरुष आणि स्त्रिया यांना वेगवेगळी वागणूक मिळते. पुरुषांना चांगले आणि मुबलक प्रमाणात जेवण मिळते, तर स्त्रियांना जे मिळते, त्यात त्यांना समाधान मानावे लागते.’ मी मुंबई येथील सेवाकेंद्रात आल्यानंतर सर्व साधकांना एकच वागणूक मिळत असल्याचे पाहिले. प.पू. डॉक्टरांच्या पत्नी सौ. कुंदाताई सर्व साधकांची अतिशय प्रेमाने काळजी घेत असत. एखाद्या साधकाला जेवायला यायला उशीर होणार असेल, तर त्या स्वयंपाकघरातील साधिकांना त्याच्यासाठी जेवण काढून ठेवायला सांगत असत. ‘कोणत्या साधकाला कोणते पथ्य आहे’, हेही त्यांना ठाऊक असायचे. आम्ही सेवेसाठी सेवाकेंद्रात गेल्यावर प.पू. डॉक्टर आणि सौ. कुंदाताई दोघेही प्रथम आम्हाला चहा आणि अल्पाहार घ्यायला सांगत असत. ते ग्रहण केल्यानंतरच आम्ही सेवेला आरंभ करत असू. त्यांचा हा प्रेमभाव इतर साधकांमधेही आपोआप रुजला गेला. वाशी, नवी मुंबई येथे नवीन सत्संग चालू झाल्यावर आम्हाला त्याचा पुष्कळ लाभ झाला. त्या वेळी साधक श्री. अमरजित सिंह आणि त्यांचे भाऊ यांच्याकडे आमच्या घराची एक चावी असायची. कधी कधी ते घरी जाऊन आमच्यासाठी रात्रीसाठी स्वयंपाक करून ठेवत असत. त्यामुळे नोकरीवरून घरी आल्यानंतर मला सेवेसाठी जाणे शक्य होत होते. प.पू. डॉक्टर आणि सौ. कुंदाताई यांच्याकडून शिकल्यामुळेच तोच प्रेमभाव आम्हा साधकांमधे रुजला गेला.

७. एका साधकाच्या घरी यजमानांच्या समवेत अनेक वेळा जाऊनही त्या ठिकाणी जाण्याच्या रस्त्याचा अभ्यास न केल्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या समवेत जातांना तो रस्ता योग्य प्रकारे दाखवू न शकणे, तेव्हा स्वतःतील ‘शिकण्याची वृत्ती नसणे आणि इतरांवर अवलंबून रहाणे’, हे स्वभावदोष लक्षात येणे

एकदा प.पू. डॉक्टर आणि सौ. कुंदाताई यांच्या समवेत मी बांद्रा (मुंबई) येथील श्री. रोहन भोजने यांच्या घरी जात होते. प्रत्यक्षात माझ्या यजमानांच्या समवेत मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेले होते; परंतु त्या ठिकाणी जाण्याच्या रस्त्याचा अभ्यास न केल्यामुळे मी त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता दाखवू शकले नाही. तेव्हा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्हाला रस्ता ठाऊक नसेल, तर आपण इतरांना विचारून घेऊ.’’ यावरून स्वतःतील ‘शिकण्याची वृत्ती नसणे’ आणि ‘इतरांवर अवलंबून रहाणे’, हे स्वभावदोष माझ्या लक्षात आले. (क्रमशः)

– सौ. सुमा पुथलत (वय ६२ वर्षे), केरळ (२१.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक