मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक
कोल्हापूर – येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व कामे मेपर्यंत पूर्ण करा, तसेच पुरामुळे बाधित होणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृती आराखडा सिद्ध ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीच्या पुरामुळे अथवा अतीवृष्टीमुळे बाधित होणार्या गावांची सूची सिद्ध करा. पुरामुळे जीवित, वित्त यांची हानी होऊ नये, यांसाठी सूक्ष्म नियोजन करा. पुराच्या पाण्यामुळे बंद होणार्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग सिद्ध ठेवा. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची पहाणी करून दुरुस्ती करून घ्या. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवा. संबंधित सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष १ जूनला चालू होतील, यासाठी योग्य नियोजन करा. जिल्ह्यात रस्ता खचणे, दरड कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका असणार्या गावांची सूची करून अशा गावांना भेटी देऊन सद्यस्थितीची माहिती घ्या.’’
प्रसाद संकपाळ यांनी जिल्ह्याची, तर सर्व विभागप्रमुखांनी त्या त्या विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या सिद्धतेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.