सातारा येथे झाडे नष्ट करणार्‍यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २८ मार्च (वार्ता.) – शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडावर आम्ल (ॲसिड) टाकून ते नष्ट करण्यात आले आहे. याविषयी सातारा नगरपालिका आक्रमक झाली असून ॲसिड प्रयोग करून झाड नष्ट करणार्‍याविरुद्ध आणि विनाअनुमती झाड तोडणार्‍या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. (आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्‍यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)

शहरातील ‘यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालया’समोर अज्ञात व्यक्तीने झाडावर आम्ल फेकले. ही माहिती ‘हरित सातारा’ या पर्यावरणप्रेमी गटाच्या वतीने सातारा नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेने घटनास्थळी पथक पाठवून घटनेचा पंचनामा करून याविषयी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनाअनुमती वृक्ष नष्ट केल्याचा गुन्हा नोंद केला, तसेच देवी कॉलनी येथील रस्त्याच्या बाजूला अनुमाने ७ फूट उंचीचे चाफ्याचे झाड, बहावा जातीचे झाड आणि सप्तपर्णीचे झाड विनाअनुमती नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी अमर लक्ष्मण जाधव, दिग्विजय अमर जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी नगरपालिकेचे वन विभागप्रमुख सुधीर चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

शहरात सार्वजनिक ठिकाणी असणारे वृक्ष नष्ट करण्याची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. शहरात २ आठवड्यांत अशा ४ घटना घडल्यामुळे सातारा नगरपालिका प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर सिद्ध झाली आहे. पालिकेच्या वन विभागाच्या वतीने चारही घटनांचा पंचनामा करून मुख्याधिकारी बापट यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न झाल्यामुळे सर्व स्तरांतून सातारा नगरपालिकेचे विशेष कौतुक होत आहे.