प्रतिदिनच्‍या दिनक्रमात पाळता येण्‍यासारखे काही नियम

१. सकाळी ६ वाजण्‍याच्‍या आत उठावे. पोट साफ झाल्‍यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्‍यावे.

२. न्‍याहारी सगळ्‍यांना सक्‍तीची नाही. कफ प्रकृती, अजीर्ण, भूक लागलेली नसल्‍यास, उन्‍हाळा-पावसाळा या ऋतूंमध्‍ये न्‍याहारी करू नये; परंतु अशा वेळी जेवण मात्र दुपारी १ वाजण्‍याच्‍या आत करावे.

३. जेवण झाल्‍यावर पोट डब्‍ब होत असल्‍यास, वयानुसार पचनशक्‍ती न्‍यून झाली असल्‍यास, मलावरोध तक्रार असल्‍यास जेवणापूर्वी आले-सैंधव खावे.

४. गरम पदार्थ घेतल्‍यानंतर गार पदार्थ किंवा गार नंतर गरम पदार्थ, दही गरम करून वा मध गरम पाण्‍यातून हे टाळावे.

५. प्रतिदिन थोडे तरी तेल सांधे आणि पोटरी यांमध्‍ये जिरवावे.

६. सध्‍या सर्व कामे उभे राहून किंवा उंचावर बसून असल्‍यामुळे थोडा वेळ भूमीवर आवर्जून बसावे. पुढे-मागे वाकणे, सूर्यनमस्‍कार, गुडघे, मणके यांचे व्‍यायाम आवर्जून करावेत.

७. संध्‍याकाळचे जेवण ७.३० वाजण्‍याच्‍या आत झालेले चांगले. ते जेवण चांगले पचते आणि प्रमेह, हृदयरोग यांसारखे आहार-विहार संबंधित आजार होत नाहीत.

वैद्या स्वराली शेंड्ये

८. थंड ऋतूमधून गरम ऋतूमध्‍ये जातांना किंवा गरम ऋतूमधून थंड ऋतूमध्‍ये जातांना आधीच्‍या ऋतूमध्‍ये सांगितलेला आहार-विहार सावकाश न्‍यून करत न्‍यावा आणि नवीन ऋतूचा आहार घेत जावा. अचानक भरपूर गरम किंवा थंड पाणी, तिखट मसालेदार अथवा थंड आणि गोड असे टोकाचे पालट एकदम करू नयेत.

९. सगळे ‘पौष्‍टिक’ पदार्थ एकत्र करून मिक्‍सरमधून फिरवले की, झाली स्‍मूदी. झटपट सगळे पोषण मिळवण्‍याच्‍या नादात बर्‍याचदा घरात असलेली फळे, पाने, दूध, सुकामेवा हे एकत्र करून हा पदार्थ केला जातो. यामध्‍ये आयुर्वेदात सांगितलेल्‍या संयोग आणि संस्‍कार यांचा विचार फारसा नसतो. दूध आणि फळे विरुद्ध आहारात येतात. यामुळे त्‍वचेसंबंधी रोग व्‍हायची शक्‍यता वाढते. शरिराचा दाह होतो ज्‍यामुळे दूरगामी मोठे आजार उद़्‍भवू शकते. गरम पाणी आणि मधसुद्धा त्‍याच प्रकारे काम करते, तेही टाळावे.

१०. सतत प्रतिदिन काकडी, गाजर यांसारख्‍या कच्च्या भाज्‍या टाळाव्‍यात. भारतीय आहार पद्धतीत एवढे कच्‍चे खायची आवश्‍यकता नाही. ते वात वाढवतात आणि ढेकर, आम्‍लपित्त यांसारखे त्रास निर्माण करतात. कोशिंबीर अल्‍प प्रमाणात फोडणी किंवा काहीतरी आंबट (लिंबू रस वा डाळिंब दाणे) असे काहीतरी घालून खावी. पावसाळ्‍यात कोशिंबीर आणि पालेभाज्‍या शक्‍यतो टाळाव्‍यात.

११. वार्षिक पंचकर्म, अधूनमधून लंघन, आजार थोड्या प्रमाणात असतांनाच त्‍याला आटोक्‍यात आणणे, हे वैद्यकीय समुपदेशनाने अवश्‍य करावे.

– वैद्या (सौ.) स्‍वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

वजन न्‍यून करतांना घ्‍यावयाची काळजी

वजन न्‍यून करतांना नेहमी हळूहळू करावे. अचानक वजन न्‍यून करण्‍यासाठी अन्‍न एकदम न्‍यून करणे, उपासमार करणे किंवा अतीव्‍यायाम करणे यांमुळे शरिरावर दुष्‍परिणाम होतात. यामध्‍ये पाणी न्‍यून झाल्‍याने होणारे आजार, तसेच अतीलंघन केल्‍याने होणारे परिणाम दिसतात. साधारणपणे शरीर एकदम बारीक होणे, चक्‍कर, खोकला, तहान, इंद्रियांची शक्‍ती आणि झोप कमी होणे, विविध सांध्‍यांमध्‍ये वेदना, मलावरोध ही लक्षणे दिसतात. एकदम वजन न्‍यून करणे, हे पित्ताशयात खडे होण्‍याचेही एक कारण आहे.

– वैद्या (सौ.) स्‍वराली शेंड्ये