मॉस्कोमधील आतंकवादी आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात ! – रशिया

रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह

मॉस्को (रशिया) – येथील क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला. बोर्टनिकोव्ह यांनी मॉस्को येथे एका बैठकीत बोलतांना सांगितले की, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तथ्यात्मक माहितीच्या आधारे हे विधान केले आहे. बोर्टनिकोव्ह पुढे म्हणाले की, ‘युक्रेन बर्‍यापैकी सक्षम असल्याचे सिद्ध करणे’, हा या आक्रमणामागील मुख्य हेतल होता. युक्रेनने त्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी आतंकवादी आक्रमण केले. युक्रेन, ब्रिटन आणि अमेरिका यांनी यापूर्वी रशियावर अशी आक्रमणे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पाश्‍चात्त्य देश आणि युक्रेन हे रशियाची मोठ्या प्रमाणात हानी करू इच्छित आहेत.

१. २२ मार्च या दिवशी  मॉस्को शहराजवळील ‘क्रोकस सिटी कॉन्सर्ट हॉल’मध्ये आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात १३९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १८२ जण घायाळ झाले होते. ‘इस्लामिक स्टेट’ने या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते.

२. या आक्रमणानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आरोप केला होता की, या आक्रमणाला इस्लामी कट्टरवादी उत्तरदायी आहेत. या आक्रमणात युक्रेनच उत्तरदायी आहे.

३. अमेरिकेने मात्र ‘मॉस्कोतील आक्रमण ‘इस्लामिक स्टेट’ने केले आहे.  या आक्रमणात युक्रेन सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही’, असे म्हटले आहे.