सौ. अर्चना चांदोरकर यांना तीव्र शारीरिक त्रास आहे. अशा अवस्थेतही सेवा करण्याची त्यांची तळमळ आणि त्यातून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आपण २६ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात पाहिली. आता आपण ‘त्यांनी भावजागृतीसाठी आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि गुरुकृपेमुळे प्रारब्ध सुसह्य झाल्याविषयी त्यांना वाटणारी कृतज्ञता’ यांविषयीची सूत्रे पाहूया.
या पूर्वीचा भाग बघण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/777669.html
(भाग २)
४. सेवा करत असतांना केलेले भावजागृतीचे प्रयत्न
४ अ. भावजागृतीचे प्रयत्न केल्यावर एकाग्रता वाढणे : पूर्वी मी काही वर्षे नोकरी आणि व्यवसाय म्हणून ‘डीटीपी’ची कामे करत असल्याने मला तशा प्रकारच्या सेवेचा अनुभव होता; परंतु तेव्हाही एकाग्रतेच्या अभावामुळे माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या होत्या. ‘विज्ञापनाची संरचना आणि माहिती पडताळणे, त्यांत सुधारणा करून विज्ञापने अंतिम करणे’, या सेवा करतांना मी भावजागृतीचे प्रयत्न केल्यावर हळूहळू माझी एकाग्रता वाढू लागली. मला माझ्या चुका लक्षात येऊ लागल्या. एके दिवशी एका विज्ञापनाविषयी संरचना पडताळतांना त्यातील प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘विद्वानाची विद्वत्ता आणि बुद्धीची बुद्धीमत्ता ही गुरुकृपेनेच प्रकट होते’, हे सुवचन वाचून ‘या सर्व सेवा मी केवळ गुरुमाऊलींच्या कृपेनेच करू शकत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
४ आ. सेवा करतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता येणे : दळणवळण बंदीपूर्वी पुणे सेवाकेंद्रात विज्ञापनांच्या संरचना इत्यादी सेवा होत असत. तेथे सेवा करतांना मी काही क्षण डोळे मिटून देवाला अनुभवण्याचा प्रयत्न करत असे; परंतु ते माझ्याकडून भावपूर्ण होत नसे. त्यामुळे सेवाकेंद्रात असणार्या श्रीकृष्णाच्या चित्रासमोर मानसरित्या उभे राहून आणि प्रार्थना करून पुन्हा सेवेला आरंभ करत असे. एकदा मी प्रार्थना करण्यासाठी हात जोडल्यावर संगणकाच्या मागे असलेल्या भिंतीवर मला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या दर्शनाने माझी भावजागृती झाली. त्यानंतर मला सेवा करतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता येऊ लागले.
४ इ. सूक्ष्मातून गुरुपादुकांचे दर्शन होणे : मी दळणवळण बंदीच्या काळात घरी सेवा करत असतांना एके दिवशी सेवेपूर्वी प्रार्थना केल्यावर संगणकाच्या वरील बाजूस असलेल्या काचेच्या पेटीत मला गुरुपादुकांचे दर्शन झाले. त्यामुळे घरी सेवा करतांनाही ‘सूक्ष्मातून गुरुदेवांचे निर्गुणरूप माझ्या समवेत आहे आणि गुरुपादुकांमधून तेच मला चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवले.
४ ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या माध्यमातून गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : मी विज्ञापनातील माहिती तपासतांना संगणकाशेजारी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवत असल्याने ‘गुरुदेव सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते. त्यामुळे ‘सेवा करतांना गुरुदेव समवेत आहेत आणि तेच सेवा करवून घेत आहेत’, हे मला अनुभवता येऊ लागले. तेव्हा माझ्याकडून ‘गुरुदेव, संपूर्ण शरीर, प्रत्येक अवयव, पेशीपेशी, मन आणि बुद्धी यांत तुमचेच अस्तित्व असू दे’, अशी सतत प्रार्थना होऊ लागली.
४ उ. विज्ञापनांविषयी सेवा करणार्या प्रत्येक साधकाप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘मी १० विज्ञापने म्हणजे १० पुष्पे श्रीगुरुचरणी अर्पण करत आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून सेवेविषयीचा ‘इमेल’ केला जात असे. आरंभी ‘केवळ माझी सेवा गुरुचरणी समर्पित करत आहे’, असा माझा भाव असायचा. गुरुदेवांनीच मला लक्षात आणून दिले, ‘विज्ञापनाची सेवा तुझ्या एकटीची नसून त्याच्याशी संबंधित विज्ञापन देणारे, विज्ञापन आणणारे साधक, अहवाल सेवक, ई.आर्.पी. करणारे साधक, अर्ज पोचवणारे साधक, जिल्हा विज्ञापनविषयी सेवा करणारा प्रत्येक साधक’, अशा अनेक जिवांची सेवा या एका विज्ञापनामध्ये सामावली आहे. त्या सर्वांचीच सेवा माझ्या चरणी समर्पित होत आहे.’ तेव्हापासून माझ्यामध्ये सर्व साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला.
५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे
५ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वभावदोषांची जाणीव करून देणे : प्रारंभी माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अत्यल्प असायचे. माझ्यातील ‘बहिर्मुखता’ आणि ‘नकारात्मक विचार करणे’, या स्वभावदोषामुंळे मला साधकांचे स्वभावदोषच दिसायचे. त्यामुळे माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरणही पुष्कळ असायचे. माझ्यामध्ये ‘कर्तेपणा, ताण घेणे, मी आणि माझी सेवा एवढाच विचार करणे, मनमोकळेपणाचा अभाव, पूर्वग्रहदूषित असणे, निष्कर्ष काढणे, अपेक्षा करणे’, अशा प्रकारचे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची तीव्रता पुष्कळ होती. त्यामुळे सेवा करतांना सहसाधकांच्या समवेत प्रसंगही घडायचे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी मला एका सत्संगात पूर्वग्रह आणि निष्कर्ष काढणे या स्वभावदोषांची जाणीव करून दिली. त्यानंतर माझ्याकडून अहंनिर्मूलनासाठी प्रयत्न चालू झाले.
५ आ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात डॉ. नरेंद्र दाते यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यावर अंतर्मुख रहाता येणे अन् आनंद मिळणे : व्यष्टी साधनेच्या आढाव्यात डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी ‘सातत्याने अंतर्मुख रहाणे, इतरांना समजून घेणे, सकारात्मक विचार करणे, कृतीला भावाची जोड देणे’ या प्रयत्नांचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवले. त्यामुळे बाह्य परिस्थिती आणि साधकांच्या स्वभावदोषांकडे लक्ष न जाता आता काही प्रमाणात अंतर्मुख होऊन साधकांप्रती कृतज्ञता अन् प्रेमभाव वाटू लागला असून मला आनंदही मिळू लागला आहे.
६. शारीरिक आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा
६ अ. शारीरिक आजारपणात गुरुदेवांनी वेळोवेळी सद्गुरु आणि संत यांच्या माध्यमातून आधार देणे : मागील ३ वर्षांपासून माझ्या रक्तातील क्रिएटिनीनचे (चयापचयातून निर्माण झालेल्या आणि मूत्रावाटे उत्सर्जित होणार्या घटकाचे) प्रमाण वाढल्याने शारीरिक त्रास चालू झाले. प्रारंभी ते स्वीकारणे मला फार कठीण गेले. औषधोपचारांच्या व्ययातही वाढ झाली. सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी दिलेला आधार, मार्गदर्शन अन् प्रेम यांमुळे मला प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळायचे. शारीरिक थकवा असल्याने सेवा करतांना मधेच झोपून रहावे लागते. तेव्हा सेवेनिमित्त एखाद्या साधकाशी बोलल्यावर मला त्यातून चैतन्य मिळून माझा थकवा आणि आवरण अल्प होऊन उत्साह वाटायचा. माझ्या मनात अनेक विचार यायचे. हे सर्व विचार मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रांजळपणे सांगितल्याने आणि तेथे मिळालेल्या साहाय्यामुळे मी त्या विचारांवर मात करू शकले. ‘खरा आनंद गुरुसेवा आणि साधना यातच आहे अन् गुरुदेव काळजी घेणारच आहेत’, याची मला जाणीव झाली. शारीरिक त्रासांमुळे मला प्रसंगांना सामोरे जाण्याची भीती वाटायची. तेव्हा मला माझ्या समवेत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून आनंद मिळायचा.
६ आ. आध्यात्मिक त्रास वाढणे आणि त्यावर आध्यात्मिक उपाय करणे : मागील वर्षभरात माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आहे. व्यावहारिक आयुष्यात मला ‘आध्यात्मिक त्रासही असतात’, हे कधी लक्षातही आले नसते. गुरुदेवांच्या कृपेनेच मला या त्रासांवर उपाय मिळाले. सद्गुरु आणि संत यांची सेवा अन् त्यांच्या चैतन्यदायी अस्तित्वामुळे, तसेच नामजपादी उपायांमुळे मला अनेक वर्षांपासून असलेले आध्यात्मिक त्रास आता अल्प होत आहेत. उपायांमुळेच मी माझी सर्व दैनंदिन कामे आणि सेवा करत आहे.
६ इ. कुटुंबियांनी सेवेत साहाय्य करणे : गुरुपौर्णिमेच्या कालावधीत विज्ञापन सेवेची व्याप्ती अधिक असल्याने घरातील कामांमध्ये माझ्या सासूबाई (श्रीमती अनुपमा अरविंद चांदोरकर, वय ७९ वर्षे) मला समजून घेतात. माझ्या यजमानांचेही (श्री. मंदार अरविंद चांदोरकर, वय ५२ वर्षे) मला सेवेत पुष्कळ साहाय्य होते.
७. कृतज्ञता
साधकांना घडवण्यासाठी सेवेच्या माध्यमातून गुरुदेवच साधकांमध्ये जन्मोजन्मींचे स्वभावदोष आणि अहं नष्ट करून गुणांचे बीज पेरत आहेत. ते मोह-माया, आसक्ती दूर करून भाव-भक्ती निर्माण करत आहेत. गुरुदेवच आम्हा सर्व जिवांचा उद्धार करत आहेत. मला माझे स्वभावदोष आणि अहं यांच्यासह स्वीकारणारी माझी गुरुमाऊली, सद्गुरु, संत आणि सर्व साधक यांच्या माध्यमातून मला वेळोवेळी मिळालेले साहाय्य अन् प्रीती यांबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
गुरुमाऊलींच्या कृपेनेच मी सर्वकाही लिहू शकले. ‘माझ्यातील कर्तेपणा नष्ट होऊन मला सातत्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करता येऊ देत, माझी भाववृद्धी होऊ दे आणि मला गुरुमाऊलींना अपेक्षित असे घडता येऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना !’
– सौ. अर्चना चांदोरकर, पुणे (१६.८.२०२३) (समाप्त)
|