सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे ‘नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’ने  साजरी केली आदर्श होळी !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम

होळीसाठी उपस्थित ‘महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अन्य

सांगोला (जिल्हा सोलापूर) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डेबुजी चौक, परिट गल्ली येथील ‘नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’तील मुलांचे आदर्श होळी साजरी करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून या मुलांनी उत्साहाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने आदर्श होळी साजरी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. संतोष पाटणे आणि सौ. शुभांगी पाटणे यांनी मंडळातील मुलांची बैठक घेऊन या संदर्भात प्रबोधन केले होते.

येथे होळी झाल्यावर दुसर्‍या दिवशी येणार्‍या-जाणार्‍या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, दूध न दिल्यास त्रास देणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती. मुलांचे या संदर्भात प्रबोधन केल्यावर त्यांनी ही प्रथा बंदी केली आणि यासाठी श्री. नवनाथ कावळे यांनी दूध उपलब्ध करून दिले. या उपक्रमात परिट गल्ली येथील सौ. नेहा कावळे आणि श्री. नवनाथ कावळे, ‘तरुण मंडळा’चे उत्सव अध्यक्ष श्री. वेदांत सचिन पाटोळे यांनी पुढाकार घेतला. या वेळी गल्लीतील सर्वश्री संदीप पाटोळे, गणेश पाटोळे, रणजित स्वामी, काशिनाथ साळुंखे, समर्थ संतोष ढोले, विनायक पाटोळे, सूरज पाटोळे, शिवराज कावळे, विराज ढोले यांसह अन्य उपस्थित होते.

शास्त्र जाणून घेऊन उत्सव साजरा केल्याने आनंद मिळाला ! – गणेश पाटोळे, माजी अध्यक्ष

हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनामुळे उत्सव साजरा करतांना त्या पाठीमागील शास्त्र जाणून घेतल्याने अनवधानाने होणारे अपप्रकार रोखले जाऊन खर्‍या अर्थाने त्यातील आनंद मिळाला.