Ujjain Mahakal Temple Fire : उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे भडकली आग !  

पुजार्‍यासह १३ जण घायाळ

उज्जैन (मध्यप्रदेश) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात २५ मार्चला धुळवडीच्या दिवशी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अचानक आग लागली. या घटनेत पुजार्‍यासह १३ जण घायाळ किरकोळ घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरतीच्या वेळी गुलाल उधळत असतांना ही घटना घडली. कुणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. त्या वेळी त्यांच्या हातात आरतीचे तबक होते. गुलालातील रसायन आगीत मिसळले गेल्याने आग भडकली असावी, असा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे. (‘रासायनिक रंगांचा होळीमध्ये वापर करू नये’, अशी जागृती करण्यासह सरकारने अशा रंगांचे उत्पादन बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक) ‘गाभार्‍यात गुलाल उधळू नयेत’, अशा सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे. (गाभार्‍यात गुलाल न उधळण्याची सूचना असतांना त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे असे कृत्य पुन्हा कुणी करणार नाही ! – संपादक) तेही या आगीत जळाले. आग लागल्यावर तातडीने अग्नीशमन दलाला बोलावण्यात आल्यावर त्यांनी ही आग आटोक्यात आणली.