डोंबिवली येथे अनधिकृत इमारतींना चोरून नळजोडणी देणारा अटकेत

डोंबिवली – बेकायदा इमारतींमध्ये चोरीचे नळ जोडणार्‍या रवी जाधव या ‘प्लंबर’ला (नळाची कामे करणार्‍याला) विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. पालिका अभियंते त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करत होते. जाधव हा सराईत पाणी चोर असल्याची माहिती पालिकेकडून पोलिसांना देण्यात आली होती. गेली अनेक वर्षे जाधव हा अशा प्रकारे चोरीच्या नळजोडण्या अनधिकृत इमारतींच्या बांधकाम व्यावसायिकांना देऊन पैसे कमवत असल्याचे लक्षात आले. पालिकेच्या मुख्य जलवाहिनाला छिद्र पाडून पश्चिम भागातील इमारतींना जाधव हा पाणी देत असे. तो चोरीच्या नळजोडण्या देत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. अनधिकृत इमारतीला पाणी देतांना त्याला रंगेहातच पकडण्यात आले. पथकाने जाधव याचे नळजोडणीचे सामान, अवजारे जप्त केली.

महेश तावडे हा जाधव याला अनधिकृत इमारती दाखवणे आणि रहिवाशांशी संपर्क करून देणे अशी मध्यस्थीची भूमिका बजावत होता. तावडे बेकायदा इमारतींमधील सदनिकामधील रहिवाशांना पालिकेचा मालमत्ता कर लावून देण्याची कामे करत होता. त्यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यालाही लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.