चि. श्रीराम अभिषेक मुरुकटे (वय ३ मास) याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

१. श्री. अभिषेक वसंत मुरुकटे (चि. श्रीरामाचे वडील), वरळी, मुंबई.

चि. श्रीराम अभिषेक मुरुकटे

 १ अ. ‘बीसीजी’ लसीमुळे बाळाच्या काखेत लालसर गाठ आली आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि त्यावर त्वरित उपचार करण्यास सुचवणे

‘१९.६.२०२३ या दिवशी बाळाला अंघोळ घालत असतांना त्याच्या डाव्या काखेत लालसर गाठ दिसली. ‘ही गाठ नेमकी कसली आहे ?’, हे समजण्यासाठी आम्ही आमच्या कौटुंबिक आधुनिक वैद्यांकडे गेलो. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘ही गाठ ‘बीसीजी’ लसीमुळे झाली आहे. हा एक क्षयरोगाचा प्रकार आहे. ‘बीसीजी’ लसीमुळे आलेली गाठ ही १० सहस्रांपैकी एखाद्या बाळाला होते. याची कारणे अनेक आहेत. त्यांपैकी ३ प्रमुख कारणे, म्हणजे लस योग्य पद्धतीने न देणे, लस योग्य तापमानात साठवणूक न करणे किंवा बाळाची रोगप्रतिकारक शक्ती न्यून असणे.’’ त्यावरील उपचारांविषयी त्यांनी आम्हाला २ पर्याय सांगितले, ‘प्रथम ही गाठ औषधाने विरघळवणे. यासाठी ६ मास औषधांचा कोर्स करावा लागेल आणि पहिल्या ३० दिवसांत त्यांचा परिणाम दिसेल. या उपचाराने गाठ न्यून झाली नाही किंवा लालसरपणा वाढला, तर गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल.’

१ आ. संतांनी सांगितलेल्या नामजपामुळे लाभ होणे

श्री. अभिषेक मुरुकटे

‘क्षयरोग’ सांगितल्यावर आम्ही सर्वजण थोडे घाबरलो होतो. ३ मासांच्या बाळाला क्षयरोगाचा प्रादुर्भाव होणे, हे प्रथमच ऐकले होते. आम्ही संतांकडून नामजपाचे उपाय त्वरित घेतले आणि ते केले. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर आम्हाला पुढील लाभ झाले.

अ. नामजपामुळे कुटुंबातील सर्वांना स्थिर रहाता आले.

आ. ३० दिवसांच्या कालावधीत बाळ खूप रडणे, न जेवणे, वजन अल्प होणे किंवा ताप येणे इत्यादींपैकी कुठलीही लक्षणे बाळामध्ये दिसली नाहीत. आधुनिक वैद्य प्रत्येक भेटीत वरील लक्षणे आवर्जून विचारत होते; परंतु आध्यात्मिक उपायांमुळे बाळाला कोणताही त्रास झाला नाही.

१ इ. शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यास सांगूनही बालरोगतज्ञ उपलब्ध न होणे

गाठ न विरघळल्याने १५.७.२०२३ या दिवशी कौटुंबिक आधुनिक वैद्यांनी बाळाची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यास सांगितली. त्यासाठी त्यांनी २ बालरोगतज्ञांची नावेही सुचवली. त्यांच्यातील एका बालरोगतज्ञाने ३ मास वयाच्या बाळाची शस्त्रक्रिया सध्या करत नसल्याचे सांगितले. दुसरे बालरोगतज्ञ मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यांनी ‘मुंबईत आल्यावर शस्त्रक्रिया करू’, असे सांगितले. कौटुंबिक आधुनिक वैद्यांना याविषयी कळवल्यावर त्यांनी २ दिवसांत शस्त्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आम्ही अन्य एका खासगी रुग्णालयात चौकशी केली; मात्र रविवार असल्याने तेथे बालरोगतज्ञ उपलब्ध नव्हते. यामुळे आम्ही सर्वजण हताश झालो होतो. या वेळी आम्ही घरामध्ये ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वर नामजप सतत चालू ठेवला होता.

१ ई. सुटीचा दिवस असतांनाही शस्त्रक्रियेचे नियोजन होणे

आम्ही शोधाशोध करूनही बालरोगतज्ञ उपलब्ध झाले नाही. रात्री १० वाजल्यानंतर माझ्या मित्रांनी मला लीलावती रुग्णालयातील एका शल्यचिकित्सकांचा संपर्क क्रमांक पाठवला. दुसर्‍या दिवशी त्या शल्यचिकित्सकांना भेटल्यावर त्यांनी सुटीचा दिवस असतांनाही ‘त्याच दिवशी शस्त्रक्रिया करूया’, असे सांगितले.

१ उ. प्रार्थना केल्यावर ‘हनुमंत बाळाची काळजी घेत आहे’, असे श्री गुरूंनी सांगणे आणि रुग्णालयात हनुमंताच्या अस्तित्वाची जाणीव होणे

शस्त्रक्रियेसाठी घरातून निघतांना माझ्याकडून श्री गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) कळवळून प्रार्थना झाली, ‘आपणच या बाळाची काळजी घ्या. बाळ ३ मासांचे आहे. ‘त्याला कुठे दुखत आहे’, हे आम्हाला कळणार नाही.’ त्या वेळी श्री गुरु सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘बाळाचे नाव ‘श्रीराम’ आहे. आपल्यापेक्षा त्याची काळजी श्री हनुमानाला आहे. तो आधीच रुग्णालयामध्ये पोचला आहे. काही काळजी करू नका.’ श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे खरंच श्री हनुमंत रुग्णालयात उपस्थित असल्याची मला पदोपदी जाणीव होत होती.

१ ऊ. शस्त्रक्रियेनंतर रात्री बाळ न रडता शांत झोपणे 

गुरुकृपेने बाळाची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. आम्हाला वाटले होते, ‘शस्त्रक्रियेमुळे बाळ रात्रभर जागे राहील किंवा रडेल’; पण तसे काहीच झाले नाही. दुसर्‍या दिवशीही ते नेहमीसारखे हसत उठले. रात्री आम्ही बाळाच्या जवळ ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील श्री गुरुदेवांचे साधना विषयक प्रवचन लावले होते. यामुळे बाळाला छान झोप लागली.

श्री गुरुदेवांच्या कृपेने जीवनातील मोठी अनुभूती अनुभवायला मिळाली. याची परतफेड करण्यासाठी आमचे पुढील अनेक जन्म कमी पडतील. या कृपेसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. श्री. वसंत मुरुकटे (चि. श्रीरामाचे आजोबा, वय ६७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वरळी, मुंबई.

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर संतांशी बोलणे होऊन १ घंट्यात शल्यचिकित्सकांशी संपर्क होणे : ‘१५.७.२०२३ च्या रात्रीपर्यंत शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सक उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही हताश झालो होतो. त्या वेळी श्री गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून सहसाधकांना याविषयी कळवले. त्या वेळी अभिषेकचे (मुलाचे) संतांशीही बोलणे झाले. त्यानंतर अनुमाने एक घंट्यामध्येच शल्यचिकित्सकांशी संपर्क झाला.

२ आ. संतांच्या कृपेने शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडणे : संतांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे श्रीरामची (नातवाची) शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. ‘नामजप आणि मंत्रजप यांमुळे नातवाच्या भोवती संरक्षणकवच निर्माण होऊन त्याच्या सहनशक्तीमध्ये वृद्धी झाली’, असे मला जाणवले.’

३. सौ. अश्विनी अभिषेक मुरुकटे (चि. श्रीरामाची आई), वरळी, मुंबई

‘१९.६.२०२३ या दिवशी बाळाच्या व्याधीचे निदान झाले. निदान होण्याच्या १० दिवस आधी ठाणे येथे संतांची (सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगिता जाधवकाकू यांची) बाळासमवेत भेट झाली होती. ‘त्या वेळी मिळालेल्या चैतन्यामुळेच बाळावर आलेल्या मोठ्या प्रसंगातून श्री गुरूंनी त्याला अगदी अलगद बाहेर काढले’, असे मला वाटते.’


हनुमान जयंतीला जन्मलेल्या बाळाचे नाव ‘श्रीराम’ असे ठेवतांना श्री. अभिषेक मुरुकटे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

 १. बाळाचा जन्म हनुमान जयंतीला झाल्याने बाळाचे नाव हनुमानाच्या नावाने ठेवण्याचे ठरवणे; परंतु हनुमंताने बाळाचे नाव ‘श्रीराम’ ठेवण्यास सुचवणे

‘६.४.२०२३ या दिवशी हनुमान जयंतीला माझ्या बाळाचा जन्म झाला. त्यामुळे ‘बाळाचे नाव हनुमानाच्या नावाने ठेवावे’, असा विचार माझ्या मनात आला. मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘तुझ्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचे आहे, तर तूच मला योग्य नाव सुचव.’ त्यावर हनुमंत म्हणाला, ‘माझे नाव ठेवण्यापेक्षा माझ्या प्रभूंचे, म्हणजे श्रीरामाचे नाव ठेवल्यास अधिक चांगले. बाळाचे नाव ‘श्रीराम’ ठेवल्यास तुम्ही ज्या वेळी बाळाला हाक माराल, त्या वेळी तुम्ही प्रभु श्रीरामाच्या जवळ जाल. तुमची साधना होईल. समाजातील व्यक्तीही बाळाला ‘श्रीराम’ म्हणून हाक मारतील, तेव्हा त्यांचीही साधना होईल. त्यामुळे त्यांच्यावरही प्रभु रामचंद्रांची कृपा होईल.’ हे ऐकून माझे मन भरून आले. तेव्हा माझ्याकडून हनुमंताला त्वरित प्रार्थना झाली, ‘हे हनुमंता, तू ठरवलेले नाव योग्यच आहे. तिन्ही लोकांत तुझ्याहून श्रेष्ठ असा श्रीरामभक्त नाही. तू बाळामध्ये तुझ्यासारखीच श्रीरामाची भक्ती निर्माण कर. त्रेतायुगात रामराज्य आणण्यासाठी तू श्रीरामाला साहाय्य केले, तसे या बाळाने श्री गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) हिंदु राष्ट्राच्या कार्यात सेवा करून याच जन्मी मोक्षप्राप्ती करून घ्यावी.’

२. बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. २२.४.२०२३ ला नामकरण विधीच्या दिवशी आमचा कुलदेव श्री जोतिबाच्या चरणी, ‘हा जीव आपल्या कुळाच्या माध्यमातून आमच्याकडे आला आहे. याची सर्वांगीण साधना होऊ दे’, अशी प्रार्थना माझ्याकडून सतत होत होती.

आ. तो पूर्ण दिवस माझ्या डोळ्यांपुढे गुरुदेवांचे श्रीरामाच्या स्वरूपातील छायाचित्र येत होते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

– श्री. अभिषेक वसंत मुरुकटे, मुंबई. (२३.४.२०२३)


समाजाची ढासळलेली सात्त्विकता !

नामकरण विधी झाल्यावर दुसर्‍या दिवशी मी कार्यालयामध्ये गेल्यावर तेथील सहकार्‍यांना माझ्या बाळाचे नाव ‘श्रीराम’ ठेवल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘हे खूपच गावठी नाव आहे. ‘मॉडर्न’ (आधुनिक) नाव ठेवायचे ना ! श्रीविष्णूचे नाव ठेवायचे होते, तर नवीन पद्धतीचे नव्हते का ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘श्रीविष्णूचे ‘मॉडर्न’ नाव म्हणजे काय ? ‘‘श्रीविष्णु सहस्रनामावलीमध्ये मागील काही वर्षांत पालट झाला आहे का ? कित्येक युगांपासून हीच श्रीविष्णु सहस्रनामावली आहे. त्यामध्ये कुठलाही पालट झालेला नाही आणि होणारही नाही.’’ त्यावर सहकारी नि:शब्द झाले. यावरून ‘समाजाची सात्त्विकता किती खालच्या स्तरावर गेली आहे ?’, याची मला जाणीव झाली.’

– श्री. अभिषेक वसंत मुरुकटे, मुंबई (२३.४.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक