चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे होळी सणाच्या निमित्ताने सौ. स्वाती शिंदे यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

होळीच्या सणाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !

‘चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे ‘होळी’चा सण सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात. या वेळी गावात २ दिवस जत्राही असते. या दिवसांत नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी रहात असलेले गावातील लोक आवर्जून गावी येऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतात. जत्रेच्या निमित्ताने गावात ग्रामदेवतेची पालखीतून मिरवणूक काढणे, तसेच सामूहिक होळीचा उत्सव साजरा करणे इत्यादी धार्मिक कृती केल्या जातात. या वेळी नांदगाव येथे गेल्यावर मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. स्‍वाती शिंदे

१. गावात सर्वत्र गोंगाट असूनही मन एकाग्र होऊन निर्विचार होणे आणि ग्रामदैवत शिवाचे तत्त्व वातावरणात कार्यरत झाल्याचे जाणवून शिवाचे दर्शन होणे

जत्रोत्सवातील पहिल्या दिवशी गावात सर्वत्र आवाज आणि गोंगाट होता; पण माझ्या मनाला चांगले वाटत होते. मी ‘काही क्षण डोळे बंद करून काय अनुभवायला येते’, हे जाणण्याचा प्रयत्न केला. माझे मन एवढ्या गोंगाटातही काही क्षणांत निर्विचार झाले. माझे आतून ध्यान लागल्यासारखे होऊन मला मनःशांती अनुभवता आली. काही क्षणांनी मी डोळे उघडल्यावर माझी भावजागृती झाली. मी माझ्या दोन्ही वहिनी सौ. विभूती आणि सौ. लक्ष्मी गायकवाड यांना ‘डोळे मिटून काय जाणवते ?’, हे अनुभवायला सांगितले. त्या वेळी दोन्ही वहिनींनी ‘मन एकाग्र होऊन लगेच नामजप चालू झाला आणि शिवाचे दर्शन झाले’, असे सांगितले. (इथले ग्रामदैवत सोमेश्वर म्हणजे ‘शिव’ असल्याने त्यांना शिवाची अनुभूती आली.) या अनुभूतीतून ‘गावातील धार्मिक प्रथा-परंपरा आणि उत्सव यांच्या वेळी वातावरणात देवाचे तत्त्व कार्यरत झालेले असते आणि आपण भाव ठेवल्यास ते अनुभवता येते’, हे माझ्या लक्षात आले.

२. श्री जाखमातादेवीच्या मंदिरात गर्दी आणि गोंगाट असूनही देवीकडे पाहून भावजागृती होणे आणि मंदिराला भिंती नसूनही उन्हाळ्यातही थंडावा जाणवणे 

गावाजवळील जंगलात स्थानदेवता ‘श्री जाखमातादेवी’चे लहानसे देऊळ आहे. जत्रेच्या दुसर्‍या दिवशी सर्व गावकरी होळीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित येतात. वर्षातून एकदा होळीच्या दिवशी श्री जाखमातादेवीच्या दर्शनासाठी पुष्कळ गर्दी असते. त्या प्रमाणे ती या वेळीही होती. काहीजण मोठ्याने बोलत होते. मंदिरातील गुरव (पुजारी) श्री जाखमातादेवीला ‘आरज’ (‘आरज’ म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी देवाला प्रार्थना करणे किंवा कौल लावणे) करत होते. मंदिराच्या ठिकाणी शांतता नसतांनाही देवीला पाहून माझी भावजागृती होत होती. मंदिराच्या चारही बाजूंना भिंती नव्हत्या, तरीही रणरणत्या उन्हात तिथे उभे राहिल्यावर पुष्कळ थंडावा जाणवत होता. ‘त्या दिवशी देवीचे तत्त्व भक्तांसाठी जागृत झाले आहे’, असे जाणवून मला तिच्या वात्सल्याप्रती कृतज्ञता वाटली.

३. ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या गावकर्‍यांच्या धार्मिक कृतीचे महत्त्व ! 

होळी प्रज्वलित करण्यापूर्वी ग्रामदेवतेच्या पालखीला (शिवाची पिंड आणि इतर देवतांचे मुखवटे ठेवलेल्या पालखीला) खांद्यावर घेऊन ढोलांच्या तालावर सर्व गावकरी होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. त्या वेळी देवाची स्तुतीवाचक वाक्ये परंपरेनुसार म्हटली जातात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर होळी प्रज्वलित करतात. या प्रथेचा उत्सवात सहभागी झालेल्या लोकांवर चांगला परिणाम झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘उपस्थित लोकांवरील रज-तमाचे आवरण निघून गेल्याने प्रत्येकाचे चेहरे काही अंशी उजळलेले दिसले.’ तेव्हा ‘प्रदक्षिणा घालणे’, या हिंदु धर्मातील धार्मिक कृतीचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

४.‘आध्यात्मिक स्तरावर धार्मिक सणांचा लाभ घ्यायला हवा !’, हे शिकायला मिळणे 

सद्यस्थितीत लोक सणांमधील धार्मिक शास्त्र समजून न घेता स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागतात. मोठमोठ्याने अनावश्यक बोलणे, कर्णकर्कश्य आवाजात भोंगे लावणे, पिपाण्या वाजवणे इत्यादी अशास्त्रीय गोष्टींमुळे लोकांना या धार्मिक सणांमधून देवतेच्या तत्त्वाचा आवश्यक त्या प्रमाणात आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. सर्वजण एकत्रित येऊन धार्मिक सण आणि उत्सव साजरे कतात; परंतु त्याला आध्यात्मिक वळण नसल्यामुळे धर्माचरण न झाल्याने सणांचे पावित्र्य बिघडते. गुरुदेवांच्या कृपेने ‘आध्यात्मिक स्तरावर या सणांचा लाभ घ्यायला हवा’, हे शिकता आल्याने मला कृतज्ञता वाटली.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक