२२ आणि २३.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागांत आपण ‘पू. नरुटेआबांनी केलेला व्यवहार, प्रपंच आणि देवभक्ती’ यांविषयी पाहिले. आजच्या भागात ‘श्री. शंकर नरुटे यांना वडिलांच्या साधनेमुळे स्वतःची साधना व्यवस्थित चालू असल्याची झालेली जाणीव आणि त्यासाठी त्यांच्या मनात असलेला कृतज्ञताभाव’ यांविषयी पाहूया.
या आधीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/776471.html
१. श्री. शंकर नरुटे यांनी त्यांचा जन्म आणि त्यांचे साधनामय जीवन यांचे श्रेय त्यांच्या वडिलांना म्हणजे पू. नरुटेआबांना देणे
१ अ. आई-वडिलांनी ‘मुलगा व्हावा’, यांसाठी नवस बोलणे, एका संतांनी ‘तुम्हाला मुलगा होणार आहे’, असे सांगितल्यानंतर बहिणीच्या पाठीवर ७ वर्षांनी साधकाचा जन्म होणे : ‘माझ्या आई-वडिलांना त्यांना ‘मुलगा होणार नाही’, असे वाटत होते. ‘मुलगा व्हावा’, यासाठी त्यांनी नवस बोलला होता. त्यानंतर त्यांनी याविषयी एका संतांना विचारले. त्या संतांनी ‘तुम्हाला मुलगा होणार आहे’, असे सांगितले. त्याप्रमाणे माझ्या बहिणीच्या जन्मानंतर ७ वर्षांनी माझा जन्म झाला.
१ आ. नवस पूर्ण होण्यासाठी नवस बोलणार्यांची साधना असावी लागणे : याविषयी एका साधकाने मला सांगितले, ‘‘नवस बोलल्यावर तो नवस पूर्ण होण्यासाठी नवस बोलणार्याची साधना असावी लागते. तुमच्या आई-वडिलांची तशी साधना असल्यामुळे तुम्ही नवसाने जन्माला आला. नवसाने मिळालेले अपत्य दैवी असते.’’
१ इ. ‘पू. नरुटेआबांच्या साधनेमुळे साधकाचा जन्म केवळ साधनेसाठी झाला आहे’, असे लक्षात येणे : यावरून माझ्या लक्षात आले की, ‘माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे ! त्याचा मला लाभ होत आहे; कारण साधनेसाठीचे माझे स्वतःचे प्रयत्न पुष्कळ अल्प आहेत.
१ ई. वडिलांच्या साधनेची शक्ती सूक्ष्मातून मिळत असणे : मला पू. आबांचा अल्प सहवास लाभला आणि जेवढा लाभला, त्याचा मी लाभ करून घेतला नाही. मी लहान असतांना वडील बाहेरगावी इतरांच्या शेतात कामाला होते. ते घरी रहायला आले आणि मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी सनातन संस्थेच्या आश्रमात रहायला आलो. असे असले, तरी ‘मला सूक्ष्मातून पू. आबांच्या साधनेची शक्ती मिळत होती’, हे आता माझ्या लक्षात येत आहे.
१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपादृष्टीमुळे कुटुंबियांचा उद्धार होणे : पू. आबांच्या साधनेमुळेच भगवंताने मला योग्य मार्गावर, म्हणजे सनातन संस्थेत आणून प.पू. डॉक्टरांसारख्या थोर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी दिली. प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी माझ्या कुटुंबियांवर असल्यामुळे आमचा उद्धार होत आहे.
‘पू. आबांना पुष्कळ ज्ञान आहे; पण ते कधीच त्याविषयी बोलत नाहीत. प.पू. डॉक्टरांनी त्यांना संत घोषित केल्यावर मला त्यांचे महत्त्व लक्षात आले. अशा संत वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला आणि मला प.पू. डॉक्टरांसारखे गुरु लाभले’, यांसाठी गुरुदेव आणि पू. आबा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘गुरुकृपेने मला ही भगवंताची लीला अनुभवता आली’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (समाप्त)
– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.५.२०२२)
|