Moscow ISIS Attack : रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

  • मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

  • इस्लामिक स्टेटने स्वीकारले आक्रमणाचे दायित्व

मॉस्को (रशिया)- रशियाची राजधानी मॉस्को येथे एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९० जण ठार, तर १४५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. यांतील बहुतेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. इस्लामिक स्टेटने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. रशियामध्ये यापूर्वीही अशा प्रकारची मोठी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत.

सौजन्य: The Telegraph

१. या संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहात ६ सहस्र लोक उपस्थित होते. तेव्हा ६-७ आतंकवाद्यांनी सभागृहात प्रवेश करून रायफलकमधून अंदाधुंद गोळीबार केला. ते जवळपास १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यात अनेक जण जागीच ठार झाले. या आतंकवाद्यांनी सभागृहात स्फोटही घडवले, तसेच आगही लावली. हे सर्व आतंकवादी सैनिकांच्या गणवेशात होते.

आतंकवाद्यांचा सभागृहात प्रवेश करून रायफलकमधून अंदाधुंद गोळीबार

२. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आतंकवाद्यांनी आधी सभागृहाबाहेरील सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला आणि त्यानंतर ते सभागृहात घुसले.या आक्रमणाची माहिती मिळताच रशियाचे सैनिक तेथे पोचले. त्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई चालू केली. ही कारवाई अद्यापही चालू असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत किती आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाच्या सैन्याने आतंकवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

३. या आक्रमणानंतर रशियातील विमानतळ, रेल्वे स्थानके आणि विविध शहरांतील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. मॉस्को शहराच्या महापौरांनी शहरातील सर्व कार्यक्रम रहित केले असून शहरातील चित्रपटगृहे आणि संग्रहालये २ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत.

अमेरिकेच्या दूतावासाने आक्रमणाची पूर्वसूचना दिल्याने पुतिन यांनी अमेरिकेचा केला होता निषेध !

रशियातील अमेरिकेच्या दूतावासाने अशा प्रकारचे आक्रमण होऊ शकते, याची आधीच कल्पना दिली होती. दूतावासाने रशियामध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकी नागरिकांना पुढील ४८ घंट्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या मेळाव्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन केले होते. ही पूर्वसूचना दिल्यामुळे पुतिन यांनी अमेरिकी दूतावासाचा निषेध केला होता.

युक्रेनकडून स्पष्टीकरण

रशियातील आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले असले, तरी या मागे युक्रेनचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर युक्रेनने स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनला अपकीर्त करण्याचा डाव असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. सध्या पुतिन यांनी या आक्रमणावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

ख्रिस्त्यांच्या मोठ्या कार्यक्रमावर केले आक्रमण ! – इस्लामिक स्टेट

इस्लामिक स्टेटने ‘अमाक’ या वृत्तसंस्थेद्वारे एक निवेदन प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रास्नोगोर्स्क शहरात ख्रिस्त्यांच्या मोठ्या कार्यक्रमावर आक्रमण केले. आतंकवादी सुरक्षितपणे त्यांच्या तळांवर परत येण्यापूर्वी त्यांनी शेकडो लोकांना ठार आणि घायाळ केले.

पंतप्रधान मोदी यांनी आक्रमणाचा केला निषेध !

मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण आतंकवादी आक्रमणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. या दु:खाच्या काळात भारत सरकार रशियाच्या लोकांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांनी संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. याविषयी आता संपूर्ण जगाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे ! कोणत्या कारणामुळे ? आणि कुठल्या विचारांमुळे ? जिहादी आतंकवादी निर्माण होतात, यांचा अभ्यास केला पाहिजे अन् अशा विचारांवर बंदी घातली पाहिजे. यासाठी जगातील विकसित देशांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !