१८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण
पणजी, २२ मार्च (वार्ता.) : अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘डलेमन रिया-आयटी ट्रेड लि.’ या आस्थापनावर गोव्यासह मुबंई आणि देहली येथे मिळून एकूण ९ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. यामधून ८० लाख रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत. ‘डलेमन रिया-आयटी ट्रेड लि.’ हे आस्थापन ‘लेखा परिक्षण (ऑडिटिंग) आणि कर सल्लागार’ या क्षेत्रांत काम करते. देहली पोलिसांनी नोंदवलेल्या प्रथमदर्शनी अहवालाच्या (एफ्.आय.आर्.) आधारावर ‘ईडी’ने हे छापे टाकले आहेत.
‘डलेमन रिया-आयटी ट्रेड लि.’ हे आस्थापन आणि इतर यांनी वर्ष २०२० मध्ये ‘वेस्टिज मार्केटिंग’ या आस्थापनाच्या अधिकोषातील खात्यातून फसवणूक करून १८ कोटी रुपये रक्कम वळवल्याचे आरोप आहेत. याच दिवशी ही रक्कम ‘डलेमन रिया-आयटी ट्रेड लि.’च्या अधिकोषाच्या खात्यातून ‘डार्विन ग्रुप ऑफ कंपनी’ यांच्या अनेक अधिकोषांतील खात्यांमध्ये, तसेच ‘डार्विन ग्रुप ऑफ कंपनी’चे मालक अजय सिंह यांच्या जवळच्या सहकार्यांच्या अधिकोषाच्या खात्यांमध्ये वळवल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. ‘वेस्टिज मार्केटिंग’ यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी केली असता ‘डलेमन रिया-आयटी ट्रेड लि.’चे संचालक बनावट असल्याचे समोर आले आहे. या गैरव्यवहाराचा लाभ थेट अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाला झाला. अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाने वर्ष २०२१ मध्ये तब्बल १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करून पुणे (महाराष्ट्र) येथील ‘लवासा’ प्रकल्प विकत घेतला होता. यामुळे ‘डार्विन’ हे आस्थापन त्या वेळी चर्चेत आले होते.