मुंबई – बॉडी मसाज (शरिराचे मर्दन) करणारी उपकरणे जप्त करण्याचा सीमाशुल्क विभागाने दिलेला आदेश न्यायालयाने रहित केला. आयात करण्यास मनाई असलेल्या वस्तूंच्या सूचीतही त्याचा समावेश केला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शरिराचे मर्दन करण्यासाठीच्या उपकरणांचा वापर ‘सेक्स टॉय’ (लैंगिक सुख मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्या वस्तू) म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे अशी उपकरणे आयात करण्यास बंदी आहे, असा दावा करून सीमाशुल्क आयुक्तांनी ही उपकरणे जप्त करण्याचे आदेश दिले होते.
सीमाशुल्क आयुक्तांनी काढलेला वरील निष्कर्ष विचित्र, आश्चर्यकारक असल्याचे न्यायालयाने या वेळी सांगितले. बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा देशांतर्गत बाजारपेठांत व्यापार केला जातो आणि त्या प्रतिबंधित वस्तू मानल्या जात नाहीत. त्यामुळे बॉडी मसाजसाठीची उपकरणे ही निषिद्ध वस्तू असल्याची सीमाशुल्क आयुक्तांची कल्पना अथवा त्यांची वैयक्तिक धारणा असल्याची टिपणीही न्यायालयाने केली.