नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेवर (सिनेट) भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. विधीमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
१. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची वर्ष २०१२ मध्ये प्रथम विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदवली.
२. गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले, तसेच ते सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा केला. राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून ‘एम्.पी.एस्.सी.’साठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मान्य करून घेतले.
३. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सर्व शाळा डिजीटल करण्याचा ध्यास घेतला आहे.
आतापर्यंत कोकणातील शेकडो शाळांना संगणकासह विविध साहित्य पुरवठा करण्यात आला. मुंबई विद्यापिठाच्या कक्षेत कोकणातील ५ जिल्ह्यांतील महाविद्यालये आहेत. त्याचसमवेत काही शहरांत विद्यापिठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालये यांतील समन्वय, तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.