देहली सेवाकेंद्रात आलेल्‍या मोराच्‍या माध्‍यमातून साधकांना साक्षात् भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवणे

‘२३.११.२०२३ या दिवशी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ दौर्‍यावर गेले. तेव्‍हा देहली सेवाकेंद्रात आम्‍ही केवळ चारच साधक होतो.

कु. मनीषा माहुर

१. २४.११.२०२३ या दिवशी दुसर्‍या घराच्‍या आगाशीत मोर, लांडोर आणि तिची पिल्ले दिसणे, साधिकेला ‘जणू भगवंत मोराच्‍या रूपात आला आहे अन् साक्षात् भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आहेत’, असे जाणवणे

सद़्‍गुरु पिंगळेकाका आणि सद़्‍गुरु नीलेशदादा बाहेर गेल्‍यानंतर दुसर्‍या दिवशी म्‍हणजे २४.११.२०२३ या दिवशी सेवाकेंद्राच्‍या जवळ असलेल्‍या दुसर्‍या घराच्‍या आगाशीत मला मोर, लांडोर अन् तिची पिल्ले दिसली. त्‍यांना पाहून मला वाटले, ‘जणू भगवंत मोराच्‍या रूपात आला आहे. साक्षात् भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आहेत.’ त्‍यांना पाहून सेवाकेंद्रातील सर्व साधकांना पुष्‍कळ आनंद आणि उत्‍साह वाटत होता.

२. ३०.१२.२०२३ या दिवशीही मला मोराचे दर्शन झाले. तेव्‍हा मोर सेवाकेंद्राच्‍या जवळ येत होता. मी आगाशीत उभी राहून त्‍याच्‍याकडे पहात होते, तरीही त्‍याला भीती वाटली नाही.

३. साधकांना प्रतिदिन सेवाकेंद्राच्‍या सभोवती मोर दिसणे आणि त्‍याच्‍या आवाजाने साधकांना आनंद होणे

त्‍यानंतर साधकांना जवळ जवळ प्रतिदिन सेवाकेंद्राच्‍या सभोवती मोर दिसत होता. साधिका रहात असलेल्‍या खोलीच्‍या खिडकीतूनही त्‍यांना मोराचे दर्शन होत असे. कधी मोर आणि मोराची लहानशी पिल्ले नृत्‍य करतांना दिसत असत. मोराच्‍या आवाजाने सर्व जण आनंदी होत असत.

३ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातून आलेल्‍या एका साधिकेला मोराला पाहून ‘येथेही रामनाथी आश्रम आणि भगवंत आहे’, असे जाणवणे : एक साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील शिबिराहून आली होती. तिची प्रकृती बरी नसल्‍याने ती झोपली होती. तिला रामनाथी आश्रमापासून दूर आल्‍यामुळे दुःख होत होते; मात्र तिने जेव्‍हा खिडकीतून मोराला नृत्‍य करतांना पाहिले, तेव्‍हा तिला उत्‍साह जाणवला आणि तिची मनाची स्‍थितीही चांगली झाली. तिला अशी अनुभूती आली की, ‘येथेही रामनाथी आश्रम आणि भगवंत आहे.’

३ आ. मी कधी आगाशीत गेले, तर मोर आणि लांडोर माझ्‍या डोक्‍यावरून उडून जातात. कधी मोर ओरडतात. तेव्‍हा मला वाटते, ‘जणू ते साधकांना बोलावत आहेत.’

३ इ. मोराने साधकाच्‍या जवळ जाणे : मोर सेवाकेंद्राच्‍या कुंपणाच्‍या भिंतीवर येऊ लागला. एक दिवस मोर सेवाकेंद्राच्‍या बैठकीच्‍या खोलीच्‍या दाराच्‍या समोरच्‍या भिंतीवर आला होता. तेथे एक साधक भ्रमणभाषवर बोलत होता. मोर त्‍या साधकाच्‍या पुष्‍कळ जवळ आला.

३ ई. साधक पूजेसाठी फुले आणायला सेवाकेंद्राच्‍या परिसरात जातात. तेव्‍हा त्‍यांना सेवाकेंद्राच्‍या कुंपणाच्‍या भिंतीवर मोर दिसतो. एकदा साधकांनी मोराला पाहिल्‍यावर तो ओरडू लागला.

३ उ. साधिकेने मोरासाठी आगाशीत घातलेले दाणे मोराने खाणे : मोर सेवाकेंद्राच्‍या आगाशीत येत होता. एकदा मोराचा आवाज आला; म्‍हणून मी त्‍याच्‍यासाठी आगाशीत दाणे घालायला गेले. तेव्‍हा मोर समोरच्‍या घराच्‍या आगाशीत होता. नंतर तो आमच्‍या आगाशीत जेथे पाण्‍याची टाकी आहे, तेथे आला. मी ‘आगाशीत दाणे टाकत आहे’, हे त्‍याच्‍या लक्षात आले आणि तो खाली पाहू लागला. मी प्रार्थना करू लागले, ‘मोराने सेवाकेंद्रातील नैवेद्य ग्रहण करावा.’ मी पुष्‍कळ वेळ प्रार्थना केल्‍यानंतर मोराने खाली येऊन दाणे खाल्ले.

३ ऊ. सेवाकेंद्रातील परिसरात पालक आणि कोथिंबीर उगवली होती. मोर तेही खात होता.

३ ए. साधकांना मोर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उडतांना दिसत होता.

४. संत सेवाकेंद्रात नसण्‍याच्‍या कालावधीतच मोराने सेवाकेंद्रात येणे आणि गुरुदेवांनी ‘काळ कितीही प्रतिकूल असला, तरीही भगवंत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने साधकांचे रक्षण करणारच आहे’, याची साधकांना जाणीव करून देणे

संत ज्‍या कालावधीत सेवाकेंद्रात नव्‍हते, त्‍याच कालावधीत मोर सेवाकेंद्रात येत होता. तेव्‍हा मला वाटले, ‘सेवाकेंद्र आणि साधक यांच्‍या रक्षणासाठी भगवंत स्‍वतःच येत आहे. तो साधकांना आनंद आणि उत्‍साहही प्रदान करत आहे. गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्‍हाला जाणीव करून दिली, ‘काळ कितीही प्रतिकूल असला, तरीही भगवंत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने आमचे रक्षण करणारच आहे.’ ‘साक्षात् गुरुदेव आणि श्रीकृष्‍ण सेवाकेंद्रात आहेत’, याची अनुभूती आम्‍ही सर्व साधकांनी घेतली.

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेनेच आम्‍हा सर्व साधकांना मोराचे दर्शन झाले. मी गुरुदेवांच्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र (१.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक